एसटी चालक वाहकास मारहाण – आरोपीस सहा महिने सक्तमजुरी

जळगाव : एसटी चालक वाहकास मारहाण करणा-या आरोपीस जळगाव जिल्हा चतुर्थ सत्र न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये अशी शिक्षा सुनावली आहे. भुसावळ एसटी डेपोचे वाहक दिपक रामकृष्ण बडगुजर व त्यांच्या सोबतचे चालक अनिल उत्तम पाटील असे दोघे आपल्या ताब्यातील भुसावळ सुरत ही प्रवासी बस 26 एप्रिल 2018 रोजी घेवून जात होते. वाटेत खेडी पेट्रोल पंपानजीक बस आली असता आरोपी नवनाथ आसाराम शिंदे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी एसटी बसच्या समोर आडवी लावून बसचा मार्ग अडवला.

बसमधे प्रवेश करत त्याने चालकासह वाहकास मारहाण केली. वाहकाच्या ताब्यातील तिकीट बुकींगचे एक हजार रुपये काढून घेतले होते. वाहक दिपक बडगुजर यांनी दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला आरोपी नवनाथ शिंदे याच्याविरुद्ध भादवि कलम 394, 353, 341, 332, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. सुरेंद्र जी. काबरा यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. त्या साक्षीदारांपैकी वाहक, चालक तसेच पंच, साक्षीदार विपुल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार आणि तपास अधिकारी संभाजी त्रंबक पाटील यांचा जबाब महत्वपूर्ण ठरला. संपूर्ण साक्षीपुराव्याअंती अतिरिक्त चतुर्थ जिल्हा व सत्र न्यायधीश शरद आर. पवार यांनी आरोपी नवनाथ शिंदे यास भा.दं.वि. कलम 353, 332 व 341 प्रमाणे दोषी धरुन त्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे. इतर कलमाखाली त्यांची निर्दोष सुटका झाली. याकामी सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार प्रमोद पांडुरंग कुलकर्णी यांनी त्यांना मदत केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here