मध्यरात्री ट्रक थांबवणा-या महिलेसह लुटारु साथीदारांना अटक

धुळे : मध्यरात्री महामार्गावर हात दाखवत धावत्या ट्रकला थांबवणा-या महिलेसह दबा धरुन बसलेल्या साथीदारांच्या मदतीने ट्रक चालकाची लुट करणा-या टोळीचा धुळ्याच्या आझादनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेली महिला व तिचे साथीदार धुळे शहरातील रहिवासी असून ओळख परेडच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची नावे अद्याप उघड केलेली नाहीत.

धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी पहाटे तिन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या घटनेत एमएच 18 बीएच 2400 क्रमांकाच्या ट्रकने इंदूर येथे औषधी नेली जात होती. या ट्रकवर ताहीर खान रियाजू खान हा चालक आणि फरदीन खान फर्याद खान हा सहचालक होता. वरखेडी उड्डाणपुलावर या टोळीतील महिलेने हात दाखवून ट्रकची वाट अडवली. ट्रक थांबताच दहा ते बारा जणांच्या दडून बसलेल्या टोळीने दोघांना ट्रकमधून खाली उतरण्यास भाग पाडले. दोघांना लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली होती.

चालक ताहीर खान याचे हातपाय बांधून त्याच्याकडील रोख आठ हजार रुपये सहाशे रुपये रोख आणि 23 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेण्यात आले. या घटनेनंतर दोघा भयभीत चालकांनी आझादनगर पोलिस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. आझादनगर पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी भा.द.वि. 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल. पो.नि. प्रमोद पाटील यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत महिलेसह तिच्या साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या चार मोटार सायकली, चाकू, लोखंडी पाईप व लाकडी दांडके असा एकुण 1 लाख 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here