अभिजात संगीताचा बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात

जळगाव दि.६ प्रतिनिधी –  कथक नृत्यातील बनारस घराण्याची परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली. तसेच अभिजात संगीताचा आणि पाश्चात्त्य संगीताचा संगम असलेल्या फ्युजन बँड ने स्वरांची रूजवात करीत रसिकांकडून कलावंतांनी दाद मिळवली. भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ची सुरवात झाली.

छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात होणाऱ्या दीपप्रज्वलनाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे विश्वस्त डाॕ. सुभाष चौधरी, जाई काजळचे राजेश गाडगीळ, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष  डाॕ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, दिपक चांदोरकर, दीपीका चांदोरकर, वेगा केमिकल्स चे भालचंद्र पाटील, अनदान देशमुख, आरजे टिया, अतुल्य भारतच्या सहाय्यक संचालक स्नेहल पाटील उपस्थित होते. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दोघंही सत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत.

अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाच्या एकवीस आवर्तने स्वराभिषेकाची! यातील प्रथम सत्रात कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड चे सादरीकरण केले. मॅसिव अटॅक कलेक्टिव्ह या बँड ने सुरवातीला ताल तिनताल मध्ये तबला, ड्रम  आणि पर्कशनवरती राग किरवाणीमध्ये सादरीकरण केले. त्यानंतर राग कौशी कानडा मधील एक तराणा ताल एकताल मध्ये गायन, सारंगी आणि की बोर्ड यांच्या बरोबरीने सादर झाला. तराणा नंतर पं. जसराज जी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला हवेली संगीत हा गायनाचा प्रकार या बँड मध्ये वेगळ्या प्रकारे सादर झाला. यानंतर राग हंसध्वनी मध्ये एक गाणं सर्वांनी मिळून प्रस्तुत केले. आणि  मृगनयनी या पं जसराज जी यांनी गायलेल्या रचनेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.

दमदार कथक नृत्याची मेजवानी – बालगंधर्व संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध सारंगी वादक पं भवानी प्रसाद मिश्रा ह्यांचे नातू व सुप्रसिद्ध सतार वादक पं अमरनाथ मिश्रा ह्यांचे पुत्र सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची प्रस्तुती केली.  त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान यांनी केली. कथक नृत्यातील बनारस घराण्याच्यी वैशिष्ट्ये त्यांनी नृत्यातून ठळकपणे दाखवत रसिकांची दाद मिळवली. “INDIA’S BEST JUDWAAH” हा उपाधी मिळवणाऱ्या सौरव गौरव ह्यांनी त्यांच्या सादरीकरणाची सुरवात राग अहिर भैरव आणि ताल रुपक मधे बांधलेली “डमरु पानी,शूल पानी,हे नटराजन नमो नमः ” ह्या दमदार शिवस्तुती ने केली.त्यानंतर ताल त्रितालात गुरु पं रविशंकर मिश्रा ह्यांच्याकडून शिकलेल्या बनारस घराण्याच्या प्राचीन बंदीशी,तोडे तुकडे,परन,तसेच काका (मौसाजी ) पं बिरजू महाराजांकडून शिकलेल्या बंदीशी प्रस्तुत केल्या.  ताल त्रिताला नंतर राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाची प्रचिती देणारी बंदीश “क्रृष्णप्रिया” वर केलेल्या भावप्रदर्शनाने प्रेक्षकांना मोहित केले.. ह्या दमदार कथक नृत्याची सांगता सौरव गौरव ह्यांनी “आनंद तांडव ” ह्या नृत्याने करुन रसिकांची वाहवा मिळवली…गुरूवंदना चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले.

आज अनुभवा शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनासह चित्रवेणू. द्वितीय दिनाची सुरुवात एका प्रतिभासंपन्न कलाकाराच्या माध्यमातून होईल कि ज्यांनी चित्रवेणू या नविन वाद्याची निर्मीती केली असून हे वाद्य विंड आणि स्ट्रिंग इंन्स्ट्रुमेंटचे कॉंबीनेशन आहे. हा कलावंत अमेरिका येथे वास्तव्यास असून ते मुळचे चेन्नई येथील आहेत. त्यांचे नाव पं. उदय शंकर असून त्यांना तबला संगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील.  द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला साथ रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनी अभिषेक रवंदे करतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here