“…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,” —- राज ठाकरे

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे तोंडभरून कौतूक केले. अशोक सराफ दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री असते, असे राज ठाकरे म्हणाले.

“अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. अशोक सराफ हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते. ४०-४० फूट उंचीचे त्यांचे कटआऊट लावले असते. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काहीही नाही. कलावंत आहे का. मग ठीक आहे, एवढे बोलून आपल्याकडे विषय संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

“परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळं असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते,” असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले. “समोर कोणीही कलाकार असू देत अशोक सराफ यांना काहीही फरक पडला नाही. कोणत्याही चित्रपटात, नाटकामध्ये त्यांनी स्वत:चा प्रभाव कायम ठेवला. ही काही साधी गोष्ट नाही. मी त्या दिवशी त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर नाटक पाहिलं. त्यांच्या प्रवेशाला नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ५०-६० वर्षं स्वत:मधील कुतहूल जागं ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here