आठ लाखाची बॅग हिसकावत पलायन करणा-यांना अटक

जळगाव : आठ लाख रुपये, लॅपटॉप, मोबाईल चार्जर, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, डायरी असा ऐवज असलेली दुकानदाराची बॅग हिसकावणा-या चौघांसह त्यांना टीप देणा-या दुकानावरील नोकर अशा एकुण पाच जणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 23 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेने त्यावेळी खळबळ माजली होती.

जळ्गावच्या दाणा बाजारातील संत हरदासराम ट्रेडर्स या दुकानाचे मालक इश्वर बारुमण मेघाणे हे 23 जानेवारी 2023 च्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरी सिंधी कॉलनीच्या दिशेने मोटारसायकलवर जात होते. त्यांच्या दुकानावर काम करणा-या नोकराने त्यांच्याकडील बॅग लुटीची माहिती तथा टीप चौघा साथीदारांना दिली होती. त्यानुसार नियोजन केल्याप्रमाणे पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात रामदेवबाबा मंदीरासमोर अज्ञात दोन मोटारसायकलस्वार इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला कट मारला होता. इश्वर मेघाणे यांची मोटार सायकल हळू झाल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या तिस-याने त्यांची बॅग हिसकावून चौथ्या साथीदारासह त्याच्या मोटारसायकलने पलायन केले होते. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.32/2023 भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाला तपासकामी सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांनी गुन्ह्याच्या शोधकामी पथके रवाना केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सुधाकर अंभोरे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पो.ना. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांनी दुकानदार इश्वर मेघाणे यांच्या दुकानावर काम करणा-या संशयीत नोकरास चौकशीकामी ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल करत त्याच्या साथीदारांना टीप दिल्याचे कबुल केले. या माहितीच्या आधारावर तसेच अधिक चौकशी तथा तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.उप.निरी आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, अल्ताफ पठाण, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, मुदस्सर काझी, पो.कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, सतिष गर्जे आदींची तिन  वेगवेगळी पथके तयार केली. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने गुन्ह्यातील इतर चौघा साथीदारांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली.

ताब्यातील चौघांसह त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली देखील तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत. एकुण पाचही आरोपीतांना 27 जानेवारीच्या मध्यरात्री तथा पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. या गुन्ह्यात दरोड्याचे कलम वाढवण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या संयुक्त गुन्हे शोध पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. अटकेती पाचही जणांची ओळखपरेड बाकी असल्यामुळे त्यांना बुरखा घालून न्यायालयात हजर  करण्यात आले. पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदरशनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here