मजुरांना मारहाण व लुट करणा-या चौघांची कारागृहात रवानगी

जळगाव : मध्यरात्री दोघा मजुरांना मारहाण करत त्यांच्याजवळ असलेली रक्कम, मोबाईल व मोटारसायकलची चावी हिसकावून नेणा-या सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सहापैकी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

कुसुंबा येथील देवेद्र शामराव काळे आणि शहा शहीद शकील हे दोघे जण 30 जानेवारीच्या मध्यरात्री सुप्रिम कॉलनी परिसरात गप्पा करत होते. त्यावेळी आलेल्या रिक्षातून चौघांपैकी तिघे खाली उतरले. त्यांनी दोघांना तुम्ही येथे का थांबले आहात असे विचारत मारहाण सुरु केली. त्याचवेळी तेथे अजून दोघे इसम आले.तिघांनी देवेंद्र काळे यास पकडून ठेवले. दोघांनी त्याच्या शर्टाचा खिशातील मोबाईल व पॅंटच्या खिशातील अठराशे रुपयांसह पाकीट बळजबरी काढुन घेतले. दोघेही आरडाओरड करत असतांना एकाने पिस्तुलसदृश्य वस्तू काढून भागो सालो यहासे असे म्हणत दोघांना पळवून लावले. ताब्यातील मोटारसायकल तेथेच सोडून दोघांनी तेथून पळ काढला. काहीवेळाने सर्व जण रिक्षाने पळून गेले. काळे आणि शहा हे दोघे काहीवेळाने आपली मोटारसायकल घेण्यासाठी आले असता त्या मोटरसायकलची चावी रिक्षातील इसमांनी काढून नेली होती. त्यामुळे दोघांनी ढकलत ढकलत ती घरी नेली.

याप्रकरणी देवेंद्र काळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित आदींनी घटनास्थळी भेट दिली होती. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सुप्रिम कॉलनीतील चौघांना अटक करण्यात आली. या अटक व तपासकामी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सतीश गरजे, छगन तायडे, सचिन पाटील, किरण पाटील, साईनाथ मुंडे, मुकेश पाटील, राहुल रगडे आदींनी सहभाग घेतला.

अटकेतील चौघांनी आपला गुन्हा कबुल केला असून या गुन्ह्यात सहा जणांचा सहभाग असल्यामुळे दरोड्याचे कलम लावण्यात आले आहे. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात चौघांना हजर करण्यात आले. चौघांची उप कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अनिस शेख यांच्यासह रतिलाल पवार व तुषार गिरासे करत आहेत. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींची ओळख परेड बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here