गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप

जळगाव दि. ७ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आदिवासी तांडे, पाड्या-वाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५००० लिटर क्षमतेचे ७० जलकुंभ आज लोकार्पण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम गांधी तीर्थच्या परिसरात झाला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, जैन फार्मफ्रेश फूड्स चे संचालक अथांग जैन, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, जैन इरिगेशनचे प्रतिनिधी म्हणून मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांची उपस्थिती होती. रावेर, चोपडा, चाळिसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल, जळगाव तालुक्यातील आदिवासी तांडे, पाड्या-वस्तांसह ग्रामपंचायतींना जलकुंभ लोकार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते उपस्थितीत सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना जलकुंभ लोकार्पणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जलकुंभासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे १०० गावांकडून नोंदणी झालेली होती आज ७० जलकुंभाचे वाटप करण्यात आले.  यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या सीएसआर म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी निधीतून जलकुंभासाठी अर्थसहाय्य लाभले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनची यामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने भवरलालजी जैन यांनी समाजाचे विश्वस्त भावनेतून काम केले. ग्रामस्वराज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांची पुढची पिढी अशोक जैन यांच्यासह जैन परिवार करीत आहे. त्याच भावनेतून गावातील पाण्याची समस्यांवर काम करण्यासाठी जलकुंभ वाटपाचे कार्य हाती घेतले. पाण्याची समस्या मोठी असून पावसाचे पाणी वाचविले पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. शाश्वत पाण्याचे स्रोत कसे निर्माण होतील त्यासाठी जबाबदारीपुर्ण कार्य केले पाहिजे. शासनासह स्वयंसेवी संस्थांकडून असलेले कार्य कौतुकास्पद आहेच मात्र त्यांच्यावर अवलंबून न राहता नागरिक म्हणून आपणही आपल्या पुर्वजांप्रमाणे पाण्याचे संवर्धन करावे असे आवाहन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

डॉ. पंकज आशिया यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्या ज्या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होत असते अशा गावांमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशन व जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जलकुंभ वाटप करण्यात आले. जलकुंभाचे चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचे आवाहन करीत जलजीवन मशिन अंतर्गत गाव पातळीवर स्वच्छता आणि पाण्याबाबत ज्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्यांनी कृतिशीलपणे कार्य केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितीन चोपडा यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here