पार्टी विथ डिफरंटचा खूनी, भ्रष्ट चेहरा

देशात आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर सत्तारूढ कॉंग्रेसच्या कारभारावर त्याच पक्षातील काही महत्त्वाकांक्षी गट तटाकडून ताशेरे झाडले गेले. नेहरू निष्ठा, इंदिरानिष्ठ संघटना, चड्डी काँग्रेस. त्यानंतर जनता पक्ष 1977 ते 1980 पर्यंत गाजला. आपापला राजकीय झेंडा गुंडाळून बलाढ्य कॉंग्रेसशी एकजुटीने लढण्यासाठी जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल, कम्युनिस्ट, शेकाप, भाकप डावे, जगजीवन राम यांची काँग्रेस फॉर डेमॉक्रसी यांनी जनता पक्ष स्थापना केला. तो केंद्रात सत्तेवरही आला. मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. हा पक्षही दुभंगला. जनता दलाचे चरण सिंह त्यानंतर चंद्रशेखर, राजीव गांधी, व्ही.पी. सिंग यांना पंतप्रधानपद मिळाले. त्यानंतर पार्टी वुईथ डिफरन्स, साधनशुचिता, चालचरित्र्य असे घोषवाक्य घेऊन एल.के. अडवाणी, अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाने भारतीय जनता पक्ष आदर्शवादी प्रशासनासह रामभक्तीचा नारा देत केंद्रासह अनेक राज्यात सत्तेवर आला.

अशा प्रकारे सभ्यता, भ्रष्टाचारमुक्त भारत आदर्श प्रशासनाचा दावा करणारा भाजपा आजच्या घटकेला कुठे आहे? महाराष्ट्रात शिवसेना तोडण्याचे महातांडव झाले. लोकशाहीचा बहुमताचा खेळला जाणारा डाव, प्रलोभनाद्वारे होणारी पक्षांतरे यामुळे गाजला. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा आला. एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना पहिल्या पक्षाचे सदस्यत्व राजीनाम्याद्वारे सोडून पुन्हा निवडून येण्याचे बंधन आले. तेही काही राजकारण्यांनी पाळले.

त्यापुढच्या म्हणजे अलीकडच्या काळात पक्षांतरबंदी कायदा फाटय़ावर मारण्यासाठी 1/3 किंवा ज्यादा सदस्य फुटल्यास पक्षांतरबंदी कायदा निष्प्रभ या तरतुदीचा लाभ चतुर खिलाडी घेऊ लागले. अलीकडच्या काळात तर भाजपाने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यात घाऊक प्रमाणात निवडून आलेले आमदारच घोडेबाजार करून, विकत घेऊन विरोधकांची सरकारे पाडली. महाराष्ट्रात तर ज्या पद्धतीने शिवसेना फोडली आणी 40 ते 50 आमदार सूरत मार्गे गुवाहाटी, गोव्यात पळाले ते पाहता भाजपचा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर आला आहे. महाराष्ट्रात कोकणातल्या शशिकांत वारीशे या पत्रकाराची ज्या पार्श्वभूमीवर हत्या झाली ते बघता वास्तवाच्या आरशात भाजपाचा खूनी चेहराही समोर आल्याचे बोलले जाते. बरे की शिवसेनेच्या फुटीर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या बाजूला दुय्यम स्थानावर देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीही आहेत. महाराष्ट्र भाजपाच्या आताच्या राज्य सरकारचे कॅप्टन म्हणून वारीशे यांच्या खूनाला राज्यप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची जबाबदारी दर्शवून भाजपा नामानिराळी राहू पहात आहे.

येथे फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांचा चेहरा समोर असता. परंतु शिंदे मुख्यमंत्री असले तरी.तो भाजपचा मुखवटा असून फडणवीस हाच खरा चेहरा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक लढवय्ये ठासून सांगत आहेत. मविआ राजवटीत परमबीर सिंह, 100 कोटी हप्ता वसुलीचा आरोप करणारा सपोनि सचिन वाजे, या गदारोळात राज्याच्या माजी गृहमंत्र्याला 14 महिने कारागृहात डांबण्याचा इतिहास निर्माण झाला. मनसुख हिरेन फडणवीसांसह भाजपाने गाजवली. शाहरुख खानच्या मुलाला खोट्या केसमध्ये अडकवणारे समीर वानखेडे गाजवायचे सोडून नवाब मलिकांना “आत” टाकले गेले. अर्थात कायदा आपले काम करतो आणि अपराध्याला शिक्षा व्हायलाच हवी हे बोलण्यासाठी ठिक असले तरी खोट्या आरोपांची, खटल्यांची निर्मिती करुन विरोधी पक्षीयांना तुरुंगात टाकण्याची कृती ही भाजपाच्या खात्यावर पराक्रम म्हणून जमा झाली असे लोकांमध्ये बोलले जाते. गेल्या 10 दिवसापासून गुजरातचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या शेअर घोटाळ्यासह त्यांच्या कंपन्यांमधील भ्रष्टाचार, तेथे एसबीआय, एलआयसीचा गुंतलेला, बुडणारा पैसा यामुळे भाजपा बॅकफूटवर गेल्याचे बोलले जाते. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” म्हणणारे अदानींच्या संपत्तीवाढीचे भागीदार असल्याची हाकाटी हाही एक भ्रष्ट चेहरा मानला जातोय. आगामी काळात महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड बहुमताची सत्ता मिळवण्याचा विक्रम करण्यासाठी भाजपा सज्ज होत असताना महाराष्ट्रात भाजपाची ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी चतुर खिलाडी म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरवले गेले. त्यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा राग आवळला आणि राकाँ नेते शरद पवार यांना कोंडीत पकडण्याचा डाव टाकला आहे. एक प्रकारे शिंदे सरकार कोसळण्याच्या काठावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेससह मविआची संभाव्य एकजूट होऊ नये आणि राज्य सरकारची होणारी बदनामी यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्राचा मोहरा वापरला जातोय. आता.13 कोटी लोकसंख्येच्या सुमारे 10 ते 11 कोटी मतदारांनी सावध रहावे. राजकारण्यांची मतलबी भांडणे, संभ्रमात टाकणारी विधाने. भावनिक लाटा यांना बळी न पडता “नेमका चि संधी साधु ओळखावा” हेच बरें अन खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here