प्रेयसीसह मुलीवर वार करत प्रियकराने भोसकले स्वत:ला

नाशिकरोड : प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने नेहरुनगर येथील केंद्रीय विद्यालयाजवळ प्रेयसी व तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत स्वतःच्या पोटावरही चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवार 17 फेब्रुवारीच्या दुपारी पाऊन वाजेच्या सुमारास घडला. या प्राणघातक हल्ल्यात प्रेयसीची प्रकृती चिंताजनक आहे. उपनगर पोलिस स्टेशनपासून जवळच हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार टाकळी रोड विघ्नहर गणेश अपार्टमेंटमध्ये राहणारी एक महिला जेलरोड चंपानगरी येथील सरजित झांजोटे ऊर्फ डिंगिया यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. सरजित हा जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करत होता. त्याने दिलेल्या फ्लॅटमध्ये ही महिला पहिल्या पतीच्या मुलीसह रहात होती. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही महिला उपनगर परिसरातील टीव्हीएस शोरुममध्ये दुचाकी दुरुस्त करण्यासाठी आली होती. दुचाकी दुरुस्तीसाठी जमा केल्यानंतर ती रिक्षाने घरी आली. मात्र, काही वेळाने शोरुममधून तिला त्यांच्या दुचाकीला जीपीएस ट्रॅकर लावल्याने बॅटरी खराब झाली असून, ती बदलावी लागणार असल्याचा निरोप आला.

त्यामुळे तिने मुलीसोबत शोरुमला जाऊन दुचाकीला लावलेल्या जीपीएसचे फोटो काढले. तिथून त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठले आणि सरजित याने दुचाकीला लावलेले जीपीएस ट्रैकर काढण्यास सांगा, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी असे सांगण्यास असमर्थता दर्शविल्याने ही महिला मुलीसह पायी नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयापर्यंत आली. तेथून सरजित याला फोन करून बोलावून घेतले. मात्र, सरजित पाऊण वाजेच्या सुमारास शाळेजवळ आला. यावेळी त्याला गाडीला जीपीएस लावल्यामुळे बॅटरी खराब झाल्याचे सांगत बॅटरीसाठी पैशांची मागणी केली.

त्यातून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याने संतापलेल्या सरजित याने तिच्या बरगडी व माने जवळ चाकूने वार केला. त्यामुळे त्या महिलेला वाचवण्यासाठी तिची मुलगी मध्ये आल्याने तिच्या कपाळावरही सरजितने वार केला. या हल्यात दोघी माय-लेकी जखमी झाल्या. त्यानंतर सरजित याने स्वतःच्या पोटावर चाकूने वार करत दुचाकीने नाशिक पुणे महामार्गाच्या दिशेने पळून गेला.

केंद्रीय विद्यालयात पालक विद्यार्थ्यांना घेण्यास आलेले असतानाच हल्ल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर उपनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी माय-लेकींना बिटको रुग्णालयात दाखल केले. त्या महिलेच्या बरगडीत वार झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर दुचाकीने पळून गेलेला सरजित पुढे नाशिक पुणे महामार्गावर गाडीवरून पडल्याने त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here