23 लाखांच्या ऑनलाईन फसवणूकीचा गुन्हा उघड

जळगाव : बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करत ऑनलाईन कार व बिजनेस लोन मिळवून देण्याची बतावणी करत तरुणाची 23 लाख 24 हजार 692 रुपयात फसवणूक झाली होती. या घटनेप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिस स्टेशनचे पो.नि. लिलाधर कानडे व त्यांच्या सहका-यांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून त्यातील 18 लाख 69 हजार रुपये हस्तगत करण्यात यश  मिळवले आहे.

जुलै 2022 ते दि.14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पुजा सुनिल चौहान (रा. मीरा रोड, मुंबई) व महेश चव्हाण (रा. नाशिक) अशी नावे सांगणा-या अनोळखी इसमांनी आपली ओळख लपवत या घटनेतील तरुणासोबत संपर्क साधला होता. आपण बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करत दोघांनी तरुणाचा विश्वास संपादन केला होता. कार व बिजनेस लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन जीएसटी टॅक्स, डॉक्युमेंट, आरटीआर व इतर ऑनलाईन प्रोसेसिंग फी द्यावी लागेल अशी  बतावणी करत या दोघांनी फसवणूक झालेल्या तरुणाकडून नेट बँकिंगद्वारे महिलेने तिच्या बँक खात्यामध्ये एकुण 23  लाख 24 हजार 692 रुपये स्विकारले होते.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरन 6/23 भादवि 420, 34 आयटी अ‍ॅक्ट 66 (डी) प्रमाणे 14 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक दिगंबर थोरात, पोना सचिन सोनवणे, पोकॉ. गौरव पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ ईश्वर पाटील आदींनी या गुन्ह्याचा तांत्रीक तपास सुरु केला. त्यानंतर पोल्सि उप निरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ  राजेश चौधरी, मपोना स्वाती पाटील, पो.ना दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील आदींचे पथक  मिरा भाईंदर  येथे  रवाना झाले.

तपास पथकाने स्थानिक पोलीसाच्या मदतीने पुजा चौहान (रा. मीरारोड पूर्व मिरा भाईदर जि.ठाणे) या महिलेस तपासकामी ताब्यात घेत तिच्याकडून गुन्हा कबुल केला. फसवणूकीच्या 23 लाख 24 हजार 692 या रकमेतील 16 लाख 60 हजार एवढी रक्कम तिच्याकडून हस्तगत करण्यात आली. याशिवाय आरोपींच्या बॅंक खात्यात असलेली 2 लाख 9 हजाराची रक्कम गोठवण्यात आली. अशा प्रकारे एकुण 18 लाख 69 हजार एवढी रक्कम हस्तगत करण्यात सायबर पथकाला यश आले आहे. चार दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला गेला आहे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ऑनलाईन लोन घेण्याचे टाळण्याचे आवाहन सायबर पोलिस स्टेशनचे पो.नि. लिलाधर कानडे यांनी केले आहे. याशिवाय अज्ञात व्यक्तीला स्वतःच्या बँक खात्याची माहिती देऊ नये आणि ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवण्याचे देखील पो.नि. लिलाधर कानडे यांनी म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here