अवैध धंद्याचे लोणी – मलई – नेत्यांमध्ये नित्त्याची जुंपते लढाई

महाराष्ट्रात बहुतेक सर्वपक्षीय राजकीय नेते समाजसेवेसाठीच आपण या क्षेत्रात आल्याचे सांगतात. शिक्षण, साखर कारखानदारी, सहकार, वकिली आदी क्षेत्रात सेवा बजावणारी एक पिढी राजकीय क्षेत्रात मंत्री – आमदार बनल्याचे आपण पाहिले. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या  70 वर्षांच्या वाटचालीत राजकारणाचा पोत बदलला.  राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले. पुढे पुढे तर काही गुन्हेगार राजकारणात एंट्री मारुन राजकारणी बनले. त्यापैकी काही नेत्यांनी आपल्या पदाचा वापर करुन अवैध धंदेवाल्यांना वठणीवर आणण्याची हवा करुन आपल्या हस्तकांकरवी अवैध धंद्याच्या कमाईचा हप्ता बिनबोभाट घरपोच कसा येईल याची व्यवस्था केली. त्यासाठी काही शिष्योत्तमांनी (पंटर) जुगार अड्डे चालवले. तरी त्यात पार्टनरशिप करण्याचा खाक्या काही नेत्यांनी राज्यात राबवल्याचे बोलले जाते. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाच्या जेष्ठतम दोन फळीकडे लक्ष दिले तर काही आमदार – मंत्री, शुगर लॉबी, एजुकेशन, को-ऑपरेटिव्ह चळवळीतून साकारले.  काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगितली जाते.

अवैध धंद्याचे आश्रयदाते असेही काहींना संबोधले जाते. खमक्या पोलीस अधिका-यांनी “हायप्रोफाईल” गुन्हेगारांवर छापा टाकला तर एसपी, आयजी पर्यंत फोनाफानी करुन “हा तर माझा माणूस केस करु नका, नाहीतर गडचिरोली, भामरागडची तयारी ठेवा” अशा प्रकारची दमबाजी काही नेते करतात. सर्वच नेते दमबाजी करत नसले तरी काहींच्या अत्यंत प्रेमळ मृदू भाषेतील या फोनमध्ये तसाच अर्थ ध्वनीत होतो.  

आताच या अवैध धंद्यांचे आणि नेत्यांच्या लागेबांधे धोपटण्याचे कारण काय? असा वाचकांचा प्रश्न योग्यच.  काल परवाच होळी शिमगा साजरा झाला. खानदेशात एलसीबी आणि रावेर पोलिसांनी मोरगावात एका शेतातल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून ज्या 17 लोकांना पकडले त्यात जुगार अड्डा चालक – मालक म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांचे नाव पुढे आले.  श्रीमान खडसे साहेब भाजपात असतांनाही त्या पक्षात असलाच उद्योग करणारा हा कार्यकर्ता आता खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन निष्ठावान आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात नाथाभाऊंची काही वर्षाची विधानसभेची सत्ता त्यांचे राजकीय स्पर्धक आमदार चंद्रकांत पाटील यांनी कब्जात घेतली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच नाथाभाऊंनी मुक्ताईनगर तालुक्यातील सट्टा, दारु, जुगार अड्डे, गुटखा अशा अवैध धंद्यांच्या आणि त्याची हप्तेखोरी स्थानिक पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पातळीवर होत असल्याचा प्रश्न विधानपरिषदेत गाजवला होता. त्याच्या काही तासांनी जळगाव पोलीसांनी हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक प्रकारे नाथाभाऊंना एकप्रकारे कैचीत पकडले. गेल्याच आठवड्यात मुक्ताईनगरात 18 लाखांचा गुटखा पकडला. “हा माझा कार्यकर्ता” अशा शब्दात पोलिसांना खडसावणारे खडसेच होते हे दुसरे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

तसे पाहिले तर केवळ खानदेशचा विचार केला तर अवैध धंदे आणि नाथाभाऊ यांचा “पुराना दोस्ताना” सर्वश्रूत आहे. काँग्रेस आघाडी सत्तेत आणि नाथाभाऊ भाजप विरोधी पक्षनेते असतांना तेव्हा राजकारणात वाढत जाणारे नेते संतोषभाऊ चौधरी यांना ते भिडले. भुसावळ परिसराच्या रोजच्या लाखोंच्या उलाढालीचे केंद्र उध्वस्त करण्यासाठी लढवय्या नाथाभाऊंनी तिन दिवस भुसावळचे अवैध धंदे हा विषय विधानसभेत गाजवला.

महाराष्ट्रातले इतर विषय डस्टबीनमध्ये टाकले असे तेव्हा काही विरोधक म्हणाले. उपमुख्यमंत्री होते आर. आर. पाटील. याच चौधरी बंधूंचे साम्राज्य खालसा करण्यासाठी नाथाभाऊंचे हाडवैरी समजले जाणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन त्यांना भुसावळात जाऊन मिळाले होते. हेतु नगरपालिकेची सत्ता हिसकणे. नंतर चाळीसगाव “राखीव” मोकळा करुन “भुसावळ मतदारसंघ राखीव” केला. भुसावळला म्हणे दरमहा पाच – दहा कोटींची अवैध धंद्याची काळी कमाई म्हटली जाते.

त्याच काळात चोपड्याचे सट्टा किंग भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नेमले गेले होते. जळगाव पोलीसांनी त्या महोदयांच्या घरात चालवल्या जाणा-या सट्टा जुगार अड्ड्यावर धाड घालून भांडे फोडले. तेव्हा आपले ते घर भाड्याने दिले होते, भाडेकरुने काय केले माहीत नाही असा खुलासा झाला. आता हे महाशय जिल्हा सहकारी बँकेवर आहेत. अर्थात भाजपा सोडून रा.कॉ.त आणखी काही वर्षापुर्वी जळगाव जिल्ह्याच्या एका पालकमंत्र्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी बोलावलेल्या क्राईम मीटिंगमध्ये न बोलावता हजेरी लावली होती. जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले ते बंद करा असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले. आणखी एका पालकमंत्र्यांने एरंडोल येथे दरमहा एक ते दोन कोटीची सट्टा उलाढाल चालते असा जाहीर आरोप केला होता.   

धुळे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात पुर्णाड (आता कर्की) आणि चोरवड या दोन चेक पोस्टवर आरटीओ प्रमाणेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे (आमदार, खासदार, मंत्री) हस्तक हप्ता वसुली करतात अशा तक्रारी आहेत. याच तक्रारी गतवर्षी खडसे यांनीही केल्या होत्या. मुक्ताई मतदार संघाला रावेरचाही भाग जोडला गेल्याने या दोन्ही तालुक्यांचे साम्राज्य आपलेच असा सर्वपक्षीय समज दिसतो. 

मुक्ताईनगर विधान सभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांच्या सुकन्या रोहिनी खडसे यांना पराभूत करुन चंद्रकांत पाटील आमदार बनले तरी नाथाभाऊंच्या सुनबाई श्रीमती रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. एकनाथराव खडसे विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर रावेर भागात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट सत्तेत दिसतो.  सन 2019 मध्ये खडसे यांच्या सत्तेला पराभूत करणा-या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या शिदोरीवर राजकारण करत राष्ट्रवादीच्या समर्थनावर लढाई जिंकली. नंतर शिंदे गटात मुसंडी मारली. दोन वर्षापूर्वी गटा तटाच्या लढाईत 13 कोटीचे टेंडर गाजले आणि मीडिया सतर्कतेने रद्द झाले.

अलीकडे शिंदेगट (व्हाया शिवसेनावासी) मंत्री गुलाबराव पाटील आणि नाथाभाऊ यांच्यातही अवैध धंद्यावरुन काही वर्ष जुंपली. मुक्ताईनगरात चंबळखोऱ्याचा डाकू अवैध धंद्याची लूटपाट करत असल्याचा आरोप या पाटलांनी केला होता. तर पाळधी म्हणजे बिहारचे “पाटणाखोरे” नव्हे काय? पाळधीत अवैध धंद्यांचा आश्रयदाता कोण? अशी भालाफेक मुक्ताईनगरातून झाली होती. राज्यमंत्री पदावरुन कॅबिनेट मंत्री बनलेले गुलाबराव आता मात्र विकासकामांच्या “मोठय़ा शिकारी”कडे वळल्याचे बोलले जाते. आजचे राजकारण पैशावर चालते. नेत्यांनाही पैसा हवाच असतो. अवैध धंद्याचे दरमहा कोट्यावधी रुपये त्यासाठीच सुखाचे वाटतात. अवैध धंदे चालकही म्हणतात, या पांढऱ्या कपड्यातील “रॉबिनहूड”ना कोण रोखणार?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here