एमपीडीए कारवाईच्या पार्श्वभुमीवर अमळनेर परिसरातील गुन्हेगारांना पो.नि. विजय शिंदे यांचा इशारा

जळगाव : पोलिस निरिक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर पोलिस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून अमळनेर शहर आणि परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. अमळनेर शहर आणि परिसराच्या गुन्हेगारी जगतात स्वत:ला बडी हस्ती समजणा-या गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात वचक बसल्याचे दिसून येत आहे. यापुर्वी अमळनेर येथे असलेले पो.नि. जयपाल हिरे यांचा दबदबा आताचे पो.नि. विजय शिंदे यांनी कायम ठेवला असल्याचे देखील बोलले जात आहे.

अमळनेर येथील गुन्हेगारी क्षेत्रात काही सक्रीय गुन्हेगार होते. दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ हा त्यापैकीच एक होता. याशिवाय शिवम उर्फ शुभम उर्फ दाऊद मनोज देशमुख याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती आणि वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 प्रमाणे या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या दोघांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करुन त्यांच्याविरुद्ध स्थानबद्धेची परिणामकारक कारवाई करण्यात आली होती.

या कारवाईमुळे इतर उगवत्या आणि काही प्रस्थापीत हुशार गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपापल्या परीने स्वत:च्या विघातक कारवायांवर आळा घालण्यास सुरुवात केली आहे. एमपीडीए कायद्यानुसार कारवाईत आपला देखील क्रमांक लागू शकतो अशी भिती त्यांना सतावत आहे. परंतु असे असले तरी देखील काही गुन्हेगारांच्या मस्तकात अजून प्रकाश पडलेला नाही. त्यामुळे ते त्यांच्याच दुनियेत मश्गुल आहेत. त्यामुळे अमळनेर पोलिसांकडून त्यांना खाकी रंगाची तंबी देण्यात आली आहे. अशा गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. विशाल विजय सोनवणे या अमळनेर येथील फरशी रोड परिसरात राहणा-या गुन्हेगाराला देखील अमळनेर पोलिसांनी वेळोवेळी तंबी दिली होती. मात्र त्याने पोलिसांच्या संकेताकडे दुर्लक्ष केले होते.

धक्कादायक वृत्तानुसार विशाल विजय सोनवणे याच्यावर एमपीडीए ची आज कारवाई  करण्यात आली असून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. विशाल याच्यावर आजपावेतो एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात आणि अमळनेर मध्ये दाखल आहेत. याशिवाय अनेक अदखलपात्र गुन्हे त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल आहेत.

दाखल गुन्ह्यामधे प्रामुख्याने मोटर सायकल चोरी करणे, महिलेचा विनयभंग करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, हिंदू मुस्लिम सारखे जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करुन सोबत शस्त्र बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, लोखंडी फायटर मारुन पिस्टल कपाळाला लावून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिन गुन्हे दाखल आहेत.

हद्दपार करण्यासह चांगल्या वर्तनाचे बॉंड घेऊन देखील विशाल सोनवणे हा पोलिसांच्या आदेशाचे पालन करत नव्हता तसेच वर्तणूकीत सुधारणा करत नव्हता. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीने समाजजीवन धोक्यात आले होते. त्याच्या दहशतवादी व गुन्हेगारी वृत्तीमुळे स्वतःच्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मनोदय काही परिवाराने बोलवून दाखवला होता. मात्र आता त्याच्याविरुद्ध करण्यात आलेल्या एमपीडीए कारवाईमुळे अमळनेरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यात अमळनेर शहरासह परिसरातील तिन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईचे अमळनेवासियांकडून निश्चितच स्वागत झाले आहे. या कारवाईत प्रामुख्याने पोलीस अंमलदार किशोर पाटील, शरद पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे, महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती अक्षदा इंगळे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय वना पाटील, चालक पोलीस हवालदार मधुकर पाटील, चालक पोलीस शिपाई सुनील पाटील, संदेश पाटील, हितेश चिंचोरे, मिलिंद भामरे या सर्वांची या कामी महत्त्वाची भूमिका आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी हे.कॉ. सुनील दामोदरे यांचा सिंहाचा वाटा आहे. जनतेस वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नसून गुन्हेगारांनी वेळीच सावध होऊन यापुढे एकही गुन्हा करु नये अन्यथा त्यांच्यावर यापेक्षाही मोठी व कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अमळनेरचे पो.नि. विजय शिंदे यांनी दिला आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here