अहमदनगर एलसीबीने केली दरोड्यातील चौघांना अटक

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवरील दरोडा प्रकरणातील चौघा सराईत आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. निमकर अर्जुन काळे (रा.रांजणगाव मशीद ता.पारनेर), शेखर उदास भोसले (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), अतुल उदास भोसले (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) व एक अल्पवयीन मुलगा रा. तळेगाव दाभाडे (जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना नगर येथील जुना टोलनाका येथून अटक करण्यात आली आहे.

१४ मार्च रोजी शर्मिला कल्याण गायकवाड यांच्या घरात दरोडेखोर आरोपींनी प्रवेश करत कल्याण गायकवाड यांच्यावर केबल व दगडाने प्राणघातक हल्ला केला. त्यात कल्याण गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. दरोडेखोरांनी गायकवाड यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १५ हजारांचा ऐवज नेला होता. शर्मिला गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी तळेगाव दाभाडे येथे असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना समजली होती.

त्या माहितीच्या आधारे वेशांतर केलेल्या एलसीबी तपास पथकाने तळेगाव दाभाडे येथे मुक्काम ठोकला होता. टोलनाका परिसरात फिरुन तपास पथकाने आरोपींचा शोध घेतला. पोलिस आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागल्यानंतर आरोपींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आरोपींचा तो प्रयत्न हाणून पाडला. चोघांना ताब्यात घेण्यात आले असले तरी तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना देखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पो.नि. अनिल कटके यांनी म्हटले आहे.

आरणगाव दुमाला येथील दरोड्यासह रायगव्हाण (ता.श्रीगोंदा) व वडनेर, लोणी हवेली, राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथे चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.निमकर काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे एकूण १२ गुन्हे आहेत. श्रीगोंदा, बेलवंडी, नगर तालुका, पारनेर या पोलिस ठाण्यात हे गुन्हे काळे याच्याविरोधात दाखल आहेत, तर अतुल भोसले हाही सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात श्रीगोंदा व बेलवंडी पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत. शेखर भोसले याच्याविरोधात सुपात पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here