फिरायला आले मुंबईत, खून केला नाशिकला — खूनातील आरोपींचा माग लागला हरियाणाला!!

नाशिक (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) :  नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांची गुरुवारी 23 मार्चच्या रात्री पावणेआठ वाजेच्या दोघा संशयितांनी चाकूने भोसकून हत्या केली होती. या हत्येचा उलगडा नाशिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि त्यांच्या सहका-यांनी लावला आहे. खंडणीसाठी श्रीमंत व्यक्तीचे गाडीसह अपहरण करण्याच्या उद्देशाने उद्योजक योगेश मोगरे यांची गाडी हिसकावण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना प्रतिकाराला सामोरे जावे लागले व त्यातून हा खूनाचा प्रकार घडल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हरियाणातील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीच्या मागावर पोलिस पथक हरियाणात तळ ठोकून आहेत.

पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलगा त्याच्या तिघा साथीदारांसोबत 15 मार्च रोजी मुंबईत आला होता. एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे खंडणीसाठी अपहरण करण्याचा बेत त्यांनी मुंबईत आखला. मात्र मुंबईत मुक्कामी राहून देखील त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यातील एक जण हरियाणात परत गेला. त्यानंतर अल्पवयीन मुलासोबत असलेल्या दोघांनी 23 मार्च रोजी नाशिक गाठले. अजितसिंग सत्यवान लठवाल (24) रा. चुडाना, हरीयाणा, अल्पवयीन मुलगा आणी एक जण अशा तिघांचा त्यात समावेश होता.

23 मार्च रोजी श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करण्यासाठी गाडी चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच एका वाहनातून तिघांना दोघे जण उतरतांना दिसले. त्याचवेळी दुसऱ्या वाहनातून त्यांना रोहीणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे एकटेच उतरतांना दिसले. त्यामुळे त्यांनी मोगरे यांच्यावर हल्ला करुन त्यांची गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोगरे यांनी त्यांचा प्रतिकार केला. तिव्र प्रतिकार होत असल्याचे बघून हल्लेखोरांनी मोगरे यांच्यावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. चाकूचे 20 ते 22 वार या घटनेत मोगरे यांच्यावर झाले होते. अतिरक्तस्रावाने मोगरे यांचा त्यात मृत्यू झाला होता.  

या प्रकरणात पोलिसांनी एका  विधिसंघर्षित बालकाला हरियाणा राज्यातून ताब्यात घेतले असून दुसरा प्रमुख संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल याला लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुरुवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले.  

साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे घटनास्थळ परिसरातील सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना आरोपींच्या शरीरयष्टीबाबत काही माहिती मिळाली आहे. आरोपींनी पळवून नेलेली कार बेलगांव कु-हे रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळून आली आहे. त्याच ठिकाणी हल्लेखोरांची शस्त्र, कपडे व एक पिशवी आढळून आली. त्यासोबतच कपडे खरेदीचे बिलही असल्याने त्यावरील पुसट मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या माहितीच्या आधारे तपास सुरु असून सहायक पोलिस निरीक्षक सुर्यवंशी यांचे एक पथक मुंबईला तर सहायक पोलिस निरीक्षक मोहिते यांचे पथक हरियाणात गेले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here