किराणा माल परस्पर विकणा-या नोकराची कारागृहात रवानगी

जळगाव : किराणा दुकानात काम करणा-या नोकराने दुकानातील माल परस्पर विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील नोकरास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. विशाल शरद पाटील (रा. मेहरुण – जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

नंदकिशोर शिंदे यांचे रामेश्वर कॉलनी परिसरात किराणा दुकान आहे. या दुकानात विशाल शरद पाटील हा कामाला होता. तो परस्पर दुकानातील सामान विकत असल्याचा संशय दुकानदार शिंदे यांना आला होता. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत विशाल पाटील याने 5 लाख 69 हजार 530 रुपये किमतीचा सामान विकल्याचे उघड झाले. 15 मार्च रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. किराणा सामान विकून मिळालेल्या रकमेपैकी तिस हजाराची रक्कम  हस्तगत करण्यात आली आहे.

विशाल पाटील हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्या माहीतीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. साईनाथ मुंडे आदींनी त्याला पुणे येथून अटक करण्यात आली. त्याला न्या. श्रीमती जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यातआली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here