जळगाव दि.२९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट क्लब यांची सभा दि.२८ जुलै ला संपन्न झाली. यामध्ये येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये स्व. किरण दहाव स्मृती टी-२० व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. ही स्पर्धा अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर घेण्यात येईल. ही सभा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत पार पडली.
या सभेत क्लब प्रतिनिधी, खेळाडू यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उत्कृष्ट प्रतिसाद दिला. अरविंद देशपांडे यांनी सभेची सुरुवातीला सर्वाचे स्वागत करित परिचय करून दिला. अविनाश लाठी यांनी येणाऱ्या क्रिकेट मौसमात घेण्यात येणाऱ्या स्व. किरण दहाड स्मृती टि-२० क्रिकेट स्पर्धा व स्व. सुरेश अग्रवाल स्मृती एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा याबाबत चर्चा करण्यात आली. विजेता व उपविजेता यांना चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. स्वराज रेडीयन्स चे संचालक तेजल पाटील यांनी विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी देण्याची घोषणा केली.
अशपाक शेख यांनी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना वैयक्तिक पारितोषिके देण्याचे प्रायोजित केले. तर पंकज महाजन यांनी प्रत्येक सामनावीर खेळाडूस ट्रॉफी देण्याचे जाहीर केले आहे. सामन्यासाठी लागणारे चेंडू साठी अविनाश लाठी यांनी अंशतः अनुदान देण्याचे जाहिर केले. ही स्पर्धा साधारणत: २ ते ३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येतील. संघाचा सहभाग हा दि. १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे हे सर्व ऑन लाईन करण्यात येणार आहे.