रेकॉर्डवरील वांन्टेड गुन्हेगारास अटक

जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील फरार आणि हव्या असलेल्या गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. विशाल राजु अहिरे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जळगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर येताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळवले.

विशाल राजु अहीरे याच्यासह त्याचे साथीदार आशुतोष सुरेश मोरे, दिक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सिताराम चौधरी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी परिसर जळगाव) असे सर्वजण 5 जुलै 2023 रोजी मेहरुण बगीच्यानजीक रात्री दहा वाजेच्या सुमारास अंधारात एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले होते. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला समजली होती.

पोलिस पथकाने त्यावेळी झडप घातली असता आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्ट्यासह तावडीत सापडला होता. मात्र इतर सर्वजण अंधाराचा फायदा घेत पलायन करण्यात यशस्वी झाले होते. पलायन करणा-यांमधे विशाल राजु अहिरे याचा देखील समावेश होता. गेल्या पाच महिन्यापासून फरार असलेला व पोलिसांना हवा असलेला विशाल अहिरे हा रेल्वेने जळगावला येत असल्याचीगोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना गोपनीय सुत्रांकडून समजली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथक रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरुन बसले होते. तो रेल्वेने प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर बाहेर येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, पोकॉ साईनाथ मुंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील विशाल अहिरे याला न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सात आणी शनीपेठ पोलिस स्टेशनला एक असे एकुण आठ गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here