धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू – खूनाचा गुन्हा दाखल

जळगाव : धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत काही जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध खूनासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत भारमल मोरे असे (रा. सुंदरनगर तांडा क्रं. 1 ता. चाळीसगाव) मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रं. 1 येथील रहिवासी खंडू पंडीत मोरे यांच्या घरासमोर असलेल्या नालीच्या पाण्याची सफाई त्यांच्या आईने केली होती. त्याचा राग आल्याने दिपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी खंडू मोरे यांना शिवीगाळ केली. आपल्याला शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी खंडू मोरे हे दिपक माळी याचे काका उत्तम लाला माळी यांच्याकडे गेले.

खंडू मोरे आणि लाला माळी हे दोघे आपसात बोलत असतांना दिपक माळी व  त्याच्यासोबत अशोक माळी, श्रीकांत माळी, प्रल्हाद, आदित्य माळी, दिपकचा भाचा असे सर्वजण खंडू मोरे यांच्या अंगावर धावून आले. सर्वांनी मिळून खंडू मोरे यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करु लागले.

खंडू मोरे यांना होत असलेली मारहाण बघून त्यांची आई, बहिण आणि वडील पंडीत मोरे असे तिघेजण वाद सोडवण्यास आले. दिपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पंडीत मोरे यांना मारहाण सुरु केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पंडीत मोरे यांना होणारी मारहाण बघून खंडू मोरे यांची बहिण भांडण सोडवण्यास आली. त्यावेळी लक्ष्मीबाई माळी व सिमा बागुल या दोघींनी खंडू मोरे यांच्या बहिणीला पकडून ठेवत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या घटनेदरम्यान कुणीतरी धारदार शस्त्राने पंडीत मोरे आणि खंडू मोरे यांच्या बहिणीच्या पाठीवर वार केले. त्यात पंडीत मोरे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here