देवयानी गोविंदवार यांची महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदाची नियुक्ती समाप्त

जळगाव : देवयानी मनोज गोविंदवार यांची महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहातील बालकांवरील अत्याचाराच्या घटनेची धारदार किनार त्यांच्या नियुक्तीला कात्री लावण्याकामी कारणीभूत ठरली आहे. राज्यपालांच्या आदेशाने व शासनाच्या उप सचिवांच्या सहीने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सामाजिक तथा  माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा देखील याकामी एक महत्वाचा दुवा ठरला आहे. देवयानी गोविंदवार यांच्याव्यतिरिक्त चौघा सदस्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांची देखील नियुक्ती समाप्त करण्यात आली आहे.

एरंडोल तालुक्यातील खडके येथील मुला मुलींच्या बालगृहात झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना गेल्या ऑगस्ट महिन्यात जगासमोर आली. या घटनेमुळे राज्यभर खळबळ माजली. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्यात महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार यांचे नाव संशयीत आरोपींच्या यादीत आले. असे असतांना त्यांचा आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे एका  कार्यक्रमात सत्कार देखील झाला. संशयीत आरोपींच्या यादीत देवयानी गोविंदवार यांचे नाव  असतांना त्यांचा झालेला सत्कार अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला. याप्रकरणी जळगाव आकाशवाणी केंद्र प्रमुखांनी आपली चुक मान्य देखील केली होती. देवयानी गोविंदवार यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याची आपल्याला कल्पना नव्हती असे केंद्र प्रमुखांकडून सांगण्यात आले होते. प्रशासनाच्या वरदहस्ताने देवयानी गोविंदवार आपल्या पदावर चिकटून बसल्या असल्याची ओरड  जनतेमधून सुरु होती. आता  त्यांच्या नियुक्तीच्या समाप्तीनंतर या चर्चेला पुर्णविराम मिळाला असल्याचे देखील म्हटले जात  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here