घरफोडीची बनावट स्टोरी उघडकीस 

जळगाव : अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडून प्रवेश करत चोरुन नेल्याची फिर्याद बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.  चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी या बनावट कथेचा पर्दाफाश केला. पोलिस यंत्रणेला वेठीस धरल्याचे उघडकीस आल्याने संबंधित फिर्यादी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

श्रीमती मिनाबाई संतोष पडवळकर (रा.तळेगाव, ता.चाळीसगाव) यांनी चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. ला या प्रकरणी 5 एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. या फिर्यादीत मिनाबाई यांनी म्हटले होते की त्यांनी त्यांच्या शेतातील कापुस व्यापाऱ्याला विकला होता. 2 एप्रिल रोजी त्यांना रक्कम मिळाली होती. 4 एप्रिलच्या रात्री 9 ते 5 एप्रिलच्या पहाटे सहा वाजेच्या कालावधीत त्यांच्या बंद घराचे कुलुप कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील लोखंडी कोठीतुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 2 लाख 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला. या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.ला गु.र.न. 75/24 भा.दं.वि. कलम 280, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास चाळीसगांव ग्रामीण पोस्टेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोहेकॉ युवराज नाईक व पोकॉ किरण देवरे यांनी सुरु केला असता त्यांना फिर्यादी महिलेच्या सांगण्यात व प्रत्यक्ष परिस्थीतीत तफावत आढळून आली. 

फिर्यादी श्रीमती मिनाबाई संतोष पडवळकर यांना शेतीकामासाठी गावातील लोकांनी वेळोवेळी उसने पैसे दिलेले होते. काही लोकांना त्यांनी उसने पैसे परत दिले होते. अनेकांचे पैसे देणे बाकी होते. त्या पैशांची मागणी लोक करत होते. श्रीमती मिनाबाई संतोष पडवळकर यांचा माहे जानेवारी 2024 मध्ये कापुस विकला गेला होता. तरीही त्यांनी काही जणांचे उधारीचे पैसे परत केले नाही. त्यामुळे घेणेकरी त्यांच्याकडे तगादा लावत होते. मिनाबाई वेळ मारुन नेत होत्या. 

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सत्य हकिकत सांगितली की, त्यांनी त्यांचे शेतातुन पिकवलेला कापुस माहे जानेवारी 2024 मध्येच व्यापाऱ्याला विकला होता. त्याचे पैसे रोख स्वरुपात त्यांना त्याच वेळी व्यापाऱ्याकडुन मिळाले होते. त्या पैशातुन काही लोकांचे पैसे त्यांनी त्याचवेळी दिले होते. तसेच त्यांनी गावातील पाच एकर शेती ताबेगहाण ठेवली होती व त्याचे पैसे त्यांनी शेत मालकाला रोख स्वरुपात दिले होते. त्यामुळे त्यांनी गावातील आणखी काही लोकांकडुन उसने घेतलेले पैसे व खते, बी बियाण्यांचे उधारीचे पैसे परत देण्यासाठी त्यांचेकडे पैसे शिल्लक नव्हते. मात्र लोक त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावत होते. त्यामुळे श्रीमती मिनाबाई संतोष पडवळकर यांना लोकांचे पैसे परत देण्यासाठी अवधी हवा होता. त्यातून त्यांना दुर्बुद्धी सुचली. 

5 एप्रिल रोजी त्यांनी पहाटे लवकर उठून घराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून घरात जावून तेथील सामान अस्ताव्यस्त  केले. घरात चोरी झाल्याचा बनाव केला जेणेकरुन त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावणारे लोक काही दिवस येणार नाही. चोरी झाल्याचा खोटा बनाव करुन पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे श्रीमती मिनाबाई संतोष पडवळकर यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनकडून करण्यात येणार आहे. सपोनि प्रविण दातरे, पोउनि कुणाल चव्हाण, पोहेको युवराज नाईक, पोकों किरण देवरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here