गुजरात राज्यातील गुटखा तस्कर – पुरवठादार नाशिक ग्रामीण पोलीसांच्या जाळयात

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेठ तालुक्यातील पिठुदीनाका तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटख्याची बेकायदा वाहतूक करणा-या पिकअप व इनोव्हा वाहनावर छापे टाकून सुमारे 14 लाख रूपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला होता.

गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून नाशिक जिल्हयात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती अटकेतील वाहन चालकांकडून समोर आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुठलेही बिल, जीएसटी पावती न देता गुटखा पुरवठा करणा-या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

किशोर गणेशाराम माळी ,(रा. चिरंजीवी हॉस्पिटल जवळ, पहाडी रोड, नानापोंडा, ता. कपराडा जि. वलसाड गुजरात) आणि उमेश वालाराम चौधरी (रा. सुतारपाडा, ता. कपराडा, जि. वलसाड गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना अनुक्रमे पेठ आणि दिंडोरी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोलीस अंमलदार किशोर खराटे, प्रविण सानप, गिरीष बागुल, सुधाकर बागुल, उदय पाठक, शिवाजी ठोंबरे, विश्वनाथ काकड, सागर काकड, मेघराज जाधव, मनोज सानप, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, विनोद टिले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here