कौटुंबिक कलहाची धग, प्रतिभा आली माहेरी — पत्नी, मुलीला ठार करुन विशाल गेला देवाघरी

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवर जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी हे लहानसे गाव आहे. या गावापासून पुढे धामणगाव बढे हे बुलढाणा जिल्ह्यातील मोठे गाव लागते. देऊळगाव गुजरी हे गाव लहान असून या गावातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. शांत असलेल्या या गावात कोणतीही अप्रिय गेल्या कित्येक वर्षापासून घडल्याचे ऐकीवात नाही. मात्र 12 एप्रिल 2024 चा दिवस या गावासाठी एक अप्रिय घटना देऊन गेला. या गावच्या जावयाने या गावात अर्थात आपल्या सासरवाडीला येऊन माहेरी आलेल्या पत्नीसह अवघ्या नऊ महिन्याच्या मुलीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. या रक्तरंजीत दुहेरी हत्येच्या घटनेनंतर या नराधमाने विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. अशा प्रकारे दोन हत्या आणि एका आत्महत्येच्या घटनेने जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्हा हळहळला. या घटनेत या नराधम बापाची तिन वर्षाची मुलगी घरीच असल्यामुळे बचावली मात्र ती पित्याच्या आणि मातेच्या कृपाछत्राला मात्र पारखी झाली. या घटनेचा सविस्तर तपशील अर्थात लेखाजोखा बघूया.

देऊळगाव गुजरी या गावात शंकर तुकाराम इंगळे हे 85 वर्ष वयाचे वयोवृद्ध जेष्ठ नागरिक राहतात. वार्धंक्याकडे पुर्णपणे झुकलेले शंकर इंगळे हे आयुष्याच्या सायंकाळी आपल्या पत्नी झुणकाबाईसह दिवस काढत होते. दोन मुले आणि एक मुलगी, सुना, नातसुना तसेच नातवंडे असा फुललेला संसाराचा डोलारा बघण्याचे सौभाग्य त्यांना मिळाले होते.

शंकर इंगळे यांची नात प्रतिभा हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील विशाल मधुकर झणके या तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर प्रतिभाचा संसार गुण्यागोविंदाने सुरु होता. तिच्या संसारवेलीवर दोन कन्यारत्नांचे आगमन झाले. प्रिया आणि दिव्या अशा दोन कन्या पदरी आल्याने प्रतिभा सुखावली होती. प्रिया तिन वर्षाची आणि दिव्या नऊ महिन्यांची झाली. मात्र गेल्या दोन महिन्यापासून नऊ महिन्याच्या दिव्यासह प्रतिभा माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यास आली होती. सासरी पतीसोबत सुरु असलेला कौटूंबिक त्रास आणि आजारपणामुळे ती माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यास आली होती. दिवसेंदिवस सासरचा हा त्रास प्रतिभाला असह्य झाला. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता.

मिळालेल्या माहितीनुसार विशालचा लहान भाऊ अर्थात प्रतिभाचा दीर लग्नायोग्य झाला होता. विशालच्या लहान भावासाठी प्रतिभाच्या लहान बहिणीच्या स्थळाची मागणी घालण्यात आली. मात्र प्रतिभाच्या बहीणीचे दुसरीकडे लग्न जुळले होते. विशालच्या भावाला प्रतिभाची लहान बहिण देण्यास तिचे आई वडील इच्छुक नव्हते. त्यांनी त्यांच्या दुस-या मुलीचे लग्न नियोजीत वरासोबत लावून दिले. त्यामुळे विशालचा प्रतिभावर राग होता. तिच्यावर सुरु असलेले दडपण आणि त्यातून होणारा मानसिक त्रास तिला असह्य झाला. त्या त्रासामुळे तिची तब्येत बिघडली. त्यामुळे ती माहेरी देऊळगाव गुजरी येथे नऊ महिन्यांची मुलगी दिव्या हिच्यासह राहण्यास आली. तिने सासरी दुधलगाव येथे परत यावे यासाठी विशाल तिची मनधरणी करत  होता. मात्र प्रतिभा पुन्हा सासरी दुधलगाव येथे येण्यास तयार नव्हती. तिन ते चार वेळा त्याने तिला सासरी परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिभा पुन्हा सासरी दुधलगाव येथे येण्यास तयार नव्हती. त्यामुळे विशाल तिच्यावर चिडला होता. त्यातच त्याच्या लहान भावासाठी तिच्या लहान बहिणीचे स्थळ नाकारण्यात आले होते. त्यामुळे देखील तो तिच्यावर चिडून होता. एकंदरीत प्रकाराने त्रस्त झालेली माहेरी आलेली प्रतिभा पुन्हा सासरी येण्यास तयार होत नव्हती.  

अखेर बेसावध प्रतिभासह तिच्यासोबत असलेल्या नऊ महिन्यांच्या अज्ञान, निष्पाप मुलीचा काळ आणि वेळ जवळ आली. 12 एप्रिल 2024 हा प्रतिभासह तिच्या मुलीच्या जीवनातील काळा दिवस उजाडला. या दिवशी प्रतिभाचा पती विशाल झणके हा काळ बनून तिच्याकडे आला. 12 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रतिभा माहेरी देऊळगाव गुजरी येथे घरात तिच्या नऊ महिन्याच्या मुलीसह एकटीच होती. घरातील सर्वजण काहीना काही कामानिमीत्त बाहेर गेलेले होते. तिचे वयोवृद्ध आजोबा शंकर इंगळे आणि आजी झुणकाबाई असे दोघेजण घराच्या बाहेर बसलेले होते.

दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रतिभाचा पती विशाल हा मोटार सायकलने तिच्याकडे आला. ठरवून आलेल्या विशालने आल्याआल्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला. टीव्हीचा आवाज मोठा केल्याने पती पत्नीचा वाद बाहेर कुणाला ऐकू जाणार नाही याची त्याने दक्षता घेतली. दोघा पती पत्नीत काहीवेळ कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याने पत्नी प्रतिभा आणि मुलगी दिव्याचा गळा चिरुन खून केला. पत्नी व मुलगी यांचा दुहेरी खून केल्यानंतर विशाल घाईघाईत घराच्या बाहेर आला. 

त्याची लगबग बघून घराबाहेर बसलेली मयत प्रतिभाची आजी झुणकाबाई हिने विशाल यास एवढ्या घाई घाईत कुठे जात आहात? असा प्रश्न केला. मी मेडीकल दुकानावर औषधी घेण्यासाठी जात आहे असे सांगून त्याने मोटारसायकलने पळ काढला. आत नातीसह तिच्या मुलीच्या खूनाचा प्रकार झाल्याचे वयोवृद्ध शंकर इंगळे आणि झुणकाबाई यांना माहितीच नव्हते.

काहीवेळाने शंकर इंगळे यांची सुन लताबाई जंगलातून घरी आली. घरात जाताच समोरचे भयावह दृष्य बघून लताबाईने जोरात किंकाळी मारली. प्रतिभा आणि तिची नऊ  महिन्यांची मुलगी दिव्या हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. दोघांचे गळे चिरलेले होते. लताबाईची सुरुवातीला जिवघेणी किंकाळी नंतर जोरात हंबरडा ऐकून घराबाहेर  बसलेले सर्वजण घरात आले. घरात आलेले सर्वजण देखील समोरचे भयावह दृश्य बघून जोरजोरात आरडाओरड करु  लागले. बघता बघता सर्व गावात हा दुहेरी खूनाचा प्रकार समजला. हा प्रकार फत्तेपूर पोलिस स्टेशनला समजला. माहिती मिळताच फत्तेपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड हे आपले सहकारी कर्मचारी सहायक फौजदार अनिल सुरवाडे, प्रविण चौधरी, गनी तडवी, मुकेश पाटील, अरुण पाटील आदींसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील हे देखील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स.पो.नि. गणेश फड यांना पुढील तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकामी उप जिल्हा रुग्णालय जामनेर येथे रवाना करण्यात आले.

या घटनेबाबत वयोवृद्ध शंकर तुकाराम इंगळे यांच्या फिर्यादीवरुन फत्तेपूर पोलीस स्टेशनला विशाल मधुकर झणके याच्याविरुद्ध दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल. भाग 5 गु.र.न. 41/2024 भा.द.वि. 302 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान फरार विशाल झणके याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना करण्यात आले. या कालावधीत फरार विशालने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची आणखी एक बातमी पुढे आली. फरार विशाल झणके याने पायांना दगड  बांधून विहीरीत उडी घेत आपली देखील जीवनयात्रा संपवली होती. घरी दुधलगाव येथे असलेली तिन वर्षाची मुलगी प्रिया मात्र बचावली होती. ती बचावली असली तरी आईबापाच्या छत्रछायेला मात्र पारखी झाली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here