मोबाईल चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा उपचारा दरम्यान मृत्यू 

मुंबई : धावत्या लोकल मधे हाताला झटका मारुन मोबाईल पळवून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत असताना त्या चोरट्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा मृत्यू झाला. मयत पोलीस हा जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील असल्याचे समजते. विशाल पवार असे या मयत पोलिसाचे नाव आहे. 

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला विशाल पवार हा कर्मचारी स्थानिक शस्त्रागार विभागात (एलए) कार्यरत होता. रविवारी 28 एप्रिल रोजी लोकलमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना माटुंगा ते शीव रेल्वे स्थानकादरम्यान त्याच्या हाताला चोरट्यांनी फटका मारला. हाताला फटका बसल्याने पवार याचा हातातील मोबाईल खाली पडला. तो मोबाईल घेऊन पळणाऱ्या चोरट्याचा पवार यांनी पाठलाग केला.

दरम्यान काही अंतर पुढे गेल्यावर पवार यांना चोरट्यासह त्याच्या साथीदारांनी एक इंजेक्शन दिले. त्यामुळे काही वेळातच विशाल पवार हा बेशुद्ध झाला. साधारण बारा तासानंतर सोमवारी जाग आल्यानंतर लोकल पकडून पवार ठाण्यातील घरी गेले. तेथे गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात कलम ३९२, ३९४ व ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना दादर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दादर पोलीस याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचे कलम वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here