बनावट फायरिंग घटनेतील उर्वरित दोघांना अटक

जळगाव : विधानसभा निवडणूक कालावधीत अपक्ष उमेदवाराच्या घरावर झालेल्या बनावट गोळीबाराच्या घटनेतील उर्वरित दोघा फरार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील तिघा संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या एमआयडीसी हद्दीतील शेरा चौक परिसरात हा बनावट गोळीबार झाला होता. फिर्यादी अपक्ष उमेदवारच आरोपी असल्याचे या घटनेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हा अयशस्वी केविलवाणा प्रयत्न निवडणुकी दरम्यान करण्यात आला होता.

दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी जळगांव शहर विधानसभा निवडणूकीतील अपक्ष उमेवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन हे रहात असलेल्या घरावर सकाळी चार वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात मोटार सायकलस्वारांनी गोळीबार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 डिसेंबर रोजी इरफान अहमद मोहम्मद हुसेन (दरेगांव ता. मालेगांव) यास ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने हा गुन्हा अहमद हुसेन याचा शालक व त्याचा मित्र मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा (रा.मालेगाव) या दोघांसोबत केल्याचे कबुल केले होते. 

इरफान व मोहम्मद शफीक बाबा या दोघांनी मालेगाव येथून मोटार सायकलने जळगाव गाठले. त्यानंतर शफीक बाबा याने त्याचे मेहुणे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या घरावर तीन राऊंड फायर केल्याचे कबुल केले. फायरिंगचा कट अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन व त्यांचा मुलगा शेख शिबान फाईज अहमद हुसेन तसेच दुसरा मुलगा शेख उमर फारुख अहमद हुसेन तसेच इरफान अहमद मोहम्मद हुसेन (रा.मालेगाव) व शरिफ उर्फ बाबा (रा.मालेगाव) यांनी रचला होता. 

दि. 5 डिसेंबर 2024 रोजी शेख अहमद शेख हुसेन (अपक्ष उमेदवार), शिबान फाईज अहमद हुसेन (रा. जळगाव), इरफान अहमद मोहम्मद हुसेन (रा. मालेगाव) यांना अटक करण्यात आली होती. हे तिघे दहा डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडीत आहेत. या घटनेतील फायरिंग करणारा मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा व त्याचा साथीदार शेख उमर फारुख अहमद हुसेन असे दोघे पसार झाले होते. पोलीस पथक या दोघांच्या मागावर होते. त्यांचा शोध सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना मालेगाव येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अँड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here