मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने सुशांतच्या आत्म्याला सदगती मिळणार होती काय…?

विशेष रिपोर्ट
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसाना बदनाम करण्याची मोहीम पध्दतशीररीत्या राबवली जात असावी,असा संशय येण्यास वाव आहे. हा संशय येण्याची कारणे देखील तशीच आहेत. त्यातील राजकीय कारणांचा विचार करण्याची आम्हाला अजिबात गरज वाटत नाही. सीबीआय या सरकारी यंत्रणेवर टीका करणे किवा त्या यंत्रणेचा मानभंग करण्याचा आमचा अजीबात हेतू नाही हे लक्षात घ्यावे. परंतू मुंबई पोलीस या संस्थेला किंवा यंत्रणेला ज्या रीतीने व ज्या पद्धतीने बदनाम केले जात आहे त्यामुळे व्यथित होऊन लेखणी उचलण्याची गरज आम्हाला वाटली.

हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बिहार पोलीस महासंचालक , जे कोणी असतील त्यांनी जी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली त्या प्रतिक्रियेतील शब्दचना तपासली असता ती प्रतिक्रिया पूर्णपणे राजकीय असल्याची दिसून आली. मुंबई पोलिसांना बिहारी पोलिसांच्या शिकवण्या लावण्याची गरज असल्याचे भासवणारे विधान नकळत त्यांनी केल्याचे जाणवते. १५ ऑगस्ट २०२० रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पोलीस पदकांच्या मानक-यांमध्ये बिहारी किती आणि मुंबईचे पोलीस किती आहेत ते त्यांनीच तपासून पहावे.

मुंबई पोलिसांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारचे ताशेरे झोडलेले नाहीत. मुंबई पोलिसांचा तपास योग्य मार्गाने चालला असल्याचे निकालपत्रात नमूद केले आहे. हरकत फक्त प्रतिवाद्यांनी इतक्या दिवसात एफआरआय का दाखल केली नाही, हाच एक मुद्दा महत्वाचा ठरला. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत धनराज वंजारी या माजी पोलिस अधिका-यांनी मीडियावरील चर्चेत स्पष्टपणे नमूद केले आहे की एफआरआय दाखल केली असता तर कुणाला तरी अटक करणे आवश्यक असते मग अटक कुणाला करायची? मुंबई पोलिसांकडे तपास होता त्या काळात अनेकांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचे वारंवार सांगितले. त्यात अनेकांचा समावैश होता. ज्यांना सातो प्रहर मुंबई पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था आहे आणि डोळ्यात तेल घालून ही व्यवस्था रात्रंदिवस राबत असते आणि त्यांच्या गराड्यात घोरत पडणारी ही मंडळी मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असे ज्यावेळी सांगते त्यावेळी वाटते की ही माणसं मुंबई पोलिसांकडील फुकटची मिळणारी सिक्युरिटी नाकारून खाजगी सुरक्षा व्यवस्था का घेत नाही?

आमच्यासारख्या सामान्यांना पडणारे हे प्रश्न या लोकांना आता पडणार नाहीत .नंतर मुंबई पोलीस त्यांना आठवतील जेव्हा या मंडळींची पूर्ण नाचक्की झालेली असेल. गुन्हे अन्वेषण आणि प्रकटीकरण, तसेच गुप्त माहिती संकलित करणे आणि ती मिळवून कमीत कमी वेळात जी हवी आहेत ती माणसे शोधण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे.
वानगीदाखल १९९७ च्या सुमारातील एक चातुर्य नमुना नमूद करणे आवश्यक ठरेल. तो खालीलप्रमाणे……

मुंबई पोलिसांकडे एक गुप्त माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आली होती. या माहितीत फार मोठा तपशील नव्हता. दहशतवादी कारवायांसाठी एक व्यक्ती आली आहे. तिचे डोळे अशा स्वरुपाचे आहेत एवढीच माहिती दिली होती. ना नाव, ना त्यांच्याकडून आश्रय घेतला जाईल अशा संभाव्य जागा, त्याचा हुलिया………काहीच माहिती नव्हती. तरीही मुंबई पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या आधारावर त्या इसमाला उचलले आणि मोठा कट उधळून लावला…. त्यावेळी पत्रकार परिषद घेतली होती. मुंबई पोलिसांचे भारतभर खास कौतुक करण्यात येत होते.

चार दिवसांनी एका नौजवान हिंदी भाषिक पत्रकाराने शोधपत्रकारितेचा आधार घेत बातमी प्रकाशित केली….सदर कथित दहशतवाद्याला गोवंडी पोलीस स्टेशननए एका भुरट्या चोरीच्या प्रकरणात अटक केली होती . एकदा तो जामीनावर सुटल्यावर त्याला पुन्हा अटक केली. त्यानंतर तो दहशतवादी असल्याचे दाखवले. आता हे सगळं खरं होतं पण त्या पेपरच्या बातमीदारानं आणि त्याच्या संपादकाने शोध पत्रकारितेच्या भ्रमात पोलिसांचे म्हणणे अर्थात बाजू मांडली नव्हती. पण ते दोघंही नर्मदेतले गोटे. त्यामुळे त्यांचा मूर्खपणा उघडा पडला.

जेव्हा अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास करायचा असतो त्यावेळी हाती लागणारा पहिला दुवा अशा रीतीने वापरला जातो. त्याला सामान्य प्रकरणात गोवले जाते व पुरावे गोळा केले जातात. तो दोन-तीनदा अशा रीतीने अडकला असताना त्याला भेटायला येणारे, त्याचे संपर्क, त्यांनी आपल्या मोबाईलवरुन केलेले फोन, त्याला आपला फोन वापरण्यासाठी देण्यास पुढे येणारा शिपाईगडी असे जाळे वापरले जाते. आणि या घट्ट विणेत अडकवून त्याला नामोहरम केले जाते. गुन्हे प्रकटीकरणाची पध्दत माहीत नसणारा भुरटा पत्रकार स्वत:ची हुशारी पुढे दाखवतो. पण प्रसिध्दी मिळवण्याच्या भ्रमात त्यांनं काय केलं हे त्याला माहीत नसते त्यामुळे कदाचित या बातम्या त्या गुन्हेगाराच्या सुटकेचे कारण ठरतात.

तर मुंबई पोलिसांचा हा दबदबा आहे .जगभरच्या पोलिसांना पाठीवर घेऊन गचांड्या देण्यात वाकबगार असणा-या चार्लस् शोभराजला मुंबई पोलीस शोधून काढतात, वॉलकॉट – डोंझे यांची गठडी तेच वळतात. उत्तर प्रदेशात धुमाकूळ घालणा-या बबलू श्रीवास्तवलाही तेच अलगद उचलतात. अशा मुंबई पोलिसांवर आक्षेप घेणं हा मूर्खपणा आहे. पण तो नुसता केला गेला नाही तर सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सोपविल्यानंतर निकालपत्रात नमूद केलेल्या टिप्पणी कडेही दुर्लक्ष करत अनेक हितसंबधी व अर्धवट लोकांनी मुंबई पोलिसांवर तोंडसुख घेण्याची एक मोहीमच सुरु केली आहे. त्यात अग्रेसर होता अर्णब गोस्वामी. मुंबई पोलिसांनी आता रितसर कारवाई सुरु केल्यानंतर तो कदाचित भानावर आला असेल. पण इतरांचा जो भ्रमनिरास होत आहे त्यातील दोन – चार तथ्ये त्यांना समजावून सांगावी असे वाटते.

आज इतक्या दिवसांनंतरही सीबीआय अधिकारी मुंबई पोलिसांनी आरंभी काढलेल्या प्राथमिक निष्कर्षाच्य पुढे गेलेले नाहीत. मुंबई पोलीस आत्महत्या हाच तर्क राखून होते. कुणीतरी पोलीस काही दडवत असल्याची आरोळी ठोकत होते आणि बाकी काही पोपट त्याच्या पावलावर पाऊल ठेवून विठू विठू करु लागले.
सुशांतचं पार्थीव सापडलं आणि त्यानंतर शवचिकित्सा पार पडल्यानंतर मुंबई पोलिसांनी आत्महत्या या शक्यतेवर लक्ष्य केंद्रीत केले होते. त्याचे कारण म्हणजे सुशांतने सुसाईड नोट ठेवली नव्हती. पण हत्या झाल्याच्या खाणाखुणा घटनास्थळी नव्हत्या. त्यानंतर घटनास्थळी ज्या ज्या वस्तू होत्या त्यावरील नॉर्मल टिपणे काढण्यात आली. म्हणजे सुशांतच्या मोबाईल फोनवरील कॉल डिटेल्स, व्हॉटस्अॅप डिटेल्स वगैरे वगैरे. त्या घडीला शक्य होत्या तेवढ्या मिळवता आल्या तेवढ्या.

पण अधिक विश्लेषणासाठी सुशांतचे ज्याच्या ज्यांच्याशी संपर्क होते त्याची परस्परांशी झालेली बोलणी मिळवण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी टेलिग्राफ कायद्यानुसार राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते. फोन या परवानगीसह राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी पाठविले असणार. त्याचे शास्त्रशुद्ध निष्कर्ष आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा स्पष्ट होणार होती . म्हणजे आत्महत्या शंभर टक्के, पण त्यासाठी कुणी प्रवृत्त केले नाही ना, याची खातरजमा त्या संभाषणांची छाननी झाल्यानंतर पूर्ण होणार होती.

मीडियातील ‘नामचिन'( शब्द मी अत्यंत जबाबदारीने वापरलाय,कारण मुंबई पोलिसांचे नाव न घेता मीडिया पंडित प्रिंट मीडियाचे वर्चस्व असताना पत्रपंडित हा शब्द वापरला जात होता) ज्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहेत… म्हणजे मुंबई पोलिसांची बदनाम करायची सुपारी कुणी दिलीय की काय अशी शंका वाटू लागते.
सीबीआय’ च्या अधिका-यांकडे सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाची कागदपत्रे सोपविण्याचा आदेश दिल्यानंतर तशी कार्यवाही मुंबई पोलिसांनी पूर्ण केल्यानंतर प्रकरण रीतसर सीबीआयच्या हाती गेले. त्यानंतर या प्रकरणातील तपासाची तपशीलवार माहिती मीडियातून रोजच्या रोज दिली जाऊ लागली.

आम्ही स्वत: पत्रकारिता करीत असल्याने अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास आणि त्यातील उघड होत जाणारी माहिती, तपशील संक्षिप्त स्वरुपात वरिष्ठातील वरिष्ठ अधिकारी देत असतो. ती प्रथा आहे. त्याप्रमाणे ती सीबीआयकडूनही पाळली जाते. आता ती माहिती किंवा तपशील कसा द्यायचा याचे एक शास्त्र आहे. बातमी करतांना आणि प्रदर्शीत करतांना फक्त वृत्ताला प्राधान्य असावे. आपली अक्कल चालवून किंवा पाजळून त्यावर टिप्पणी करणे कितपत योग्य याचे भान ठेवणे आवश्यक असते.
‘सीबीआय’ने तपास सुरू केल्यानंतर दैनंदिन तपशील पुरवण्याचा जो सोपस्कार पाळला जातो त्यात मिळालेला तपशील स्पष्ट करून सांगताना वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांतून प्रक्षेपित करताना शेरेबाजी केली गेली. ती मुंबई पोलीस कामचुकार असल्याचे भासविणारी होती. मुंबई पोलीस फार मंद काम करतात,असा आरोप करणारी होती. सीबीआय अत्यंत जलदगतीने काम करत आहे आणि तपास हाती घेतल्यापासून काही तासात त्यांनी या बाबी उघडकीस आणल्या असे सांगताना मुंबई पोलिस जो तपशील उघड करण्यासाठी फोरेन्सिक रिपोर्टचा दाखला देतात आणि म्हणतात सीबीआय या गतीने काम करते म्हणून सीबीआय चौकशी करण्याला विरोध केला जात होता. दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्यांना गुन्हे प्रकटीकरण, त्याच्या संबधातील प्रशासनिक तरतुदी माहित नाहीत, सायबर कायदे वाचले नाहीत ते भरपूर कमाई होते म्हणून मीडियात घुसले आणि मग अशा प्रकारच्या बातम्या फैलवू लागले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत होते असा उल्लेख आहे. त्याकडे सर्व वृत्तवाहिन्या दुर्लक्ष करुन मुंबई पोलिसांवर विश्वास उरला नसल्याचे सांगणा-या आणि टिमकी बडवणा-या सेलिब्रिटींची संख्या वाढवत सुटले आहेत. त्या सर्व सेलिब्रिटींनाही कळावे की आपल्याला इतके दिवस ओरखड्याचाही त्रास न होता सुरक्षित ठेवणारे मुंबईचे पोलीस आहेत बिहारचे नाहीत. तेव्हा आपली निरर्गल पिरपिर थांबवली पाहिजे.

आता इतक्या दिवसांच्या तपासातून उघड काय झाले? जो निष्कर्ष बांधून मुंबई पोलीस तपास करत होते, त्याच निष्कर्षाप्रत सीबीआय अधिकारी आहेत. तसेच जे नवीन कंगोरे पुढे येऊ लागले, त्यातून आता बॉलीवूडमधील अंमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या दिशेने गेले आहे. त्यामुळे सुशांतला न्याय मिळण्याची हमी देणा-याची तोंडे कडवट दिसत आहेत. त्याने आत्महत्तया केली नाही, हत्या झाली किंवा त्याला आत्महत्त्या करण्यास कुणी प्रवृत्त केले असा निष्कर्ष निघू शकत नाही.

ड्रग ट्रॅफिकिंग रॅकेटचा पाठपुरावा झाल्यावर सुशांतच्या आत्म्याला सदगती मिळेल असे वाटत नाही. कारण या रॅकेटचे धागेदोरे पार दिल्लीपर्यंत गेल्याचे आणि मुख्य रॅकेटियरपर्यंत तपासयंत्रणा जाऊ शकत नसल्याचे याआधी उघड झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता असेच लोंबकळत राहणार हे स्पष्ट झाले आहे.
साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ज्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली त्यांना मनापासून वाटते का की आता सुशांतच्या आत्म्याला सदगती मिळेल..?
के. रवी (पत्रकार मुंबई )
93265 73590

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here