निलगाय शिकार प्रकरणी दोघांविरुद्ध वन विभागाची कारवाई

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : रात्र गस्ती दरम्यान निलगायींची शिकार करणा-या दोघांना वन विभागाच्या पथकाने पाठलाग करुन मुद्देमालासह पकडण्यात यश मिळवले आहे. नारायण नामदेव गाउत्रे (50) व सुभाष अमृत भंडारे (53), दोघे रा. सावरगांव ता. घाटंजी अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वन विभागाच्या या कारवाईने परिसरात निलगायींची शिकार करणा-या गोटात खळबळ माजली आहे.

घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी रात्री माथणी परिमंडळाचे वनपाल शशांक सोनटक्के यांच्यासह बोथ येथील वनरक्षक दिगांबर पोटे, वनरक्षक अनिकेत चव्हाण (भाडउमरी) हे रात्रगस्त करत होते. दरम्यान रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वन्यजीव विभागातील सावंगी (संगम) बीट कक्ष क्रमांक 127 परिसरात प्रादेशिक विभागाच्या शेत शिवारात बॅटरीच्या उजेडात दोघे संशयीत आढळून आले. दोघांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या कब्जातून नीलगाय वन्य प्राण्यांचे मांसाचे तुकडे साडीच्या कापडामध्ये गुंडाळलेले आढळून आले. यावेळी संशयितांकडून निलगाय चे 80 किलो मांस, सहा दुचाकीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित आरोपी नारायण गाऊत्रे व सुभाष भेंडारे यांच्या विरुद्ध  माथणी येथील वनपाल एस. जे. सोनटक्के यांनी वन्यजीव निलगाय (रोही) प्राणी (भारतीय वन्यजीव संरक्षण) अधिनियम 1972 सुधारित 2002 नुसार प्राणी पकडणे व विद्युत करंट लाऊन शिकार करणे या आरोपाखाली  भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 (सुधारित) 2002 चे कलम 9 अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कार्यवाही पांढरकवडा येथील वनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी (क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती), विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत सोनुले, वनपाल शशांक सोनटक्के, वनरक्षक दिगंबर पोटे व वनरक्षक अनिकेत चव्हाण आदींनी पार पाडली. घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याच्या सिमेवरील शेती भागात शिकारी सदृश्य हालचाली आढळून आल्यास शेतकरी व नागरीक यांनी तात्काळ वन्यजीव विभागास माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव व ओळख गुप्त ठेवण्यात येईल. या प्रकरणी सर्वांनी वन्यजीव विभागास सहकार्य करण्याचे आवाहन, पांढरकवडा येथील विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here