माजी नौदल अधिकाऱ्यास मारहाण – शिवसैनिकांना जामीन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्स अ‍ॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी कांदिवलीत शिवसैनिकांनी सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी समता नगर पोलिसांकडून सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. अटकेतील सहा शिवसैनिकांना जामीन मंजूर झाला आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम (३९) यांच्यासह संजय शांताराम मांजरे (52), राकेश राजाराम बेळणेकर (31), प्रताप मोतीरामजी सुंदवेरा (45), सुनिल विष्णू देसाई (42), राकेश कृष्णा मुळीक (35) यांची नावे आहेत.

कांदिवलीच्या समतानगर लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मारहाणीत मदन शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला इजा झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मदन काशिनाथ शर्मा यांनी ‘महानगर -1’ या व्हॉट्स अ‍ॅप गृपवर राजकीय पुढार्‍यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केले होते. या कारणावरुन कमलेश कदम यांचेसह इतर आठ ते दहा जणांनी फिर्यादीला मारहाण केल्याचा आरोप असलेली फिर्याद समता नगर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.

सदर गुन्हा भा. दं. वि.कलम 325, 143, 147, 149 नुसार दाखल झाला होता. आज शनिवारी सकाळी कोर्टात हजर केले असता सहाही जणांचा जामीन मंजूर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here