घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील भांबोरा ता. घाटंजी येथील पाच जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. घाटंजी येथील द्वितीय न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. निर्दोषमुक्त पाच जणांच्या वतीने ॲड. एम. बी. राठोड यांनी बाजू मांडली.
घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील वसंता पवार, आतिष राठोड, मनोज राठोड, धिरज राठोड व अमोल राठोड यांनी जगदंबा मार्केटिंगच्या नावाने फिर्यादी दयाराम राठोड यांना पैसे गुंतवण्यास सांगितले होते. त्यानुसार फिर्यादी दयाराम भिका राठोड यांनी नोंदणी फी म्हणून 300 रुपये व 200 रुपये हप्त्याने असे एकूण पंधराशे रुपये गुंतवले होते. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दयाराम राठोड यांनी घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
वसंता पवार, आतिष राठोड, मनोज राठोड, धीरज राठोड व अमोल राठोड (सर्व रा. भांबोरा ता. घाटंजी) यांच्याविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, सह कलम 34 व कलम 7 (3) लाॅटरी रेग्युलेशन ॲक्ट 1998 अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक एम. एम. राऊत यांनी करत घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणी फिर्यादीसह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात कमी पडल्याने पुराव्या अभावी वसंता पवार, आतिष राठोड, मनोज राठोड, धिरज राठोड व अमोल राठोड या पाचही जणांची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर (न्यायालय क्रंमाक 2) यांच्या न्यायालयाने अपराधातून फौजदारी प्रक्रिया संहिता 248 (1) मधील प्रावधानित तरतुदीनुरुप निर्दोष मुक्तता केली. वसंता पवार व इतर यांच्यातर्फे ॲड. एम. बी. राठोड यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.