घाटंजी – यवतमाळ : पांढरकवडा पोलिसांवर चाकू हल्लाप्रकरणी प्रथम वर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने आरोपी प्रतीक नटराज पिल्ले यास आठ वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे. प्राप्त माहितीनुसार २९ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री ११.३० वाजता अग्रसेन भवन नजीक दुर्गा देवी मंडपाजवळ गर्दी होती. त्यावेळी आरोपी प्रतीक पिल्ले व एका समाजाच्या समुदायात वाद सुरु होता. हातात चाकू घेऊन आरोपी प्रतीक पिल्ले हा त्याठिकाणी हजर असतांना घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक संजीव खंदारे, पोलीस नायक सुहास मंदावार, सचिन मरकाम, सुजीत सोनोने, नितीन गेडाम यांनी धाव घेतली.
पोलीस उप निरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अपराध क्रंमाक ७४६/२०१७ अन्वये भादंवि कलम ३०७, ३३२, ३३३, ३२६, ३५३, १८६, १८९, २९४, ५०४, ५०६ सह कलम ४/२५ शस्त्र अधिनियम अंतर्गत पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पांढरकवडा पोलीस सदर प्रकरणाचा तपास करून पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात केले. सदर प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी पक्षाचा साक्षी पुरावा ग्राहय धरल्याने व गुन्हा सिद्ध केल्याने आरोपी प्रतिक पिल्ले यांस भादंवि कलम ३०७ मध्ये ८ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, कलम ३३३ मध्ये ५ वर्ष, कलम ३३२ मध्ये २ वर्ष, कलम ३२६ मध्ये ५ वर्ष, कलम ३२४ २ वर्ष, कलम ५०६ मध्ये २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येक शिक्षेमागे आरोपी प्रतिक पिल्ले यांस दंड ही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रशांत मानकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार मनोहर कुमरे यांनी सहकार्य केले. तर आरोपीतर्फे ॲड. ललीत देशमुख यांनी काम पाहिले.