यवतमाळ – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागेश उर्फ श्रीकांत मधुकर तेलंगे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष (अतिरिक्त सत्र न्यायाधिश केळापूर हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
दि. 31 जुलै 2018 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील मौजा ढोकी (वाई) येथील पिडीत बालिका तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला जात असतांना आरोपीने तिला बळजबरी गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बालिकेचे पोट दुखू लागल्यानंतर तिने या घटनेची हकीकत तिच्या आईला हकीकत सांगितली. पिडितीने पांढरकवडा पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी आरोपी नागेश तेलंगे यांच्याविरुद्ध 7 ऑगस्ट 2018 रोजी लेखी तक्रार दिली. त्यानुसार पांढरकवडा पोलिस स्टेशनला आरोपी नागेश तेलंगे यांच्याविरुद्ध भा. द. वि. कलम 376 (3 ), 376 (2 )(आय), सह कलम 4 बाल लैंगिक अत्याचार कायदा व 3 (2 )(v), 3 (2 )(va),3 (1 )(w)(i) अनु.जाती, जमाती प्र. अधि. नुसार अपराध क्र. 660 /18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन केळापुर विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अभियोग पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमेश डी. मोरे यांच्याकडून एकूण 15 महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी अभियोग पक्षाची बाजू ग्राह्य धरुन आरोपीस भांदवि कलम 376 (3 ) मध्ये व 3 (2 )(va) अनु.जाती, जमाती प्र. अधि.मध्ये वीस वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच 3 (1 )(w)(i) अनु. जाती, जमाती प्र. अधि. मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा केळापूर विशेष (अतिरिक्त सत्र न्यायाधिश) हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने सुनावली आहे. आरोपीच्या वतीने अॅड. शितल जयस्वाल यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार मनोहर कुमरे यांनी साक्षीदार हजर करण्याकामी मदत केली.