घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – साडीचा पदर ओढून दोनशे रुपये दाखवत महिलेचा विनयभंग करणा-या आरोपीस कलम 354 नुसार दोन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, कलम 354 (अ) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. राहुल कुंभारे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. 21 जून 2018 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिडीत महिला पायी जात असतांना घडलेल्या या घटनेप्रकरणी दुस-या दिवशी 22 जून 2018 रोजी पांढरकवडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. भा. द. वि. कलम 354 , 354 (अ), सह तत्कालिन कलम 3 (1) (11) अनु. जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या तरतुदीनुसार अपराध क्र. 516/2018 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पांढरकवडा उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. अभियोग पक्षातर्फे केळापूर सहाय्यक शासकीय अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी या खटल्यात महत्वाच्या पाच साक्षीदारांची तपासणी केली. पैरवी अधिकारी म्हणून सहायाक पो. नि. मनोहर कुमरे यांनी कामकाज पाहिले.