घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – तहसीलदारांच्या वाहन चालकाचा अपमान व त्यास मारहाण करणा-या माजी आमदारांच्या नातेवाईक आरोपीस दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. किशोर नांदेकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. भां.द.वि कलम 353 अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, कलम 332 अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुयये दंड, कलम 186 अन्वये तीन महिने सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड तसेच कलम 3 (1)(10) अनु. जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये दोन वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा असे या शिक्षेचे स्वरुप आहे.
दि. 22 मे 2015 रोजी मौजा सिंधी वाढोणा येथे एका महिलेवर वाघाने हल्ला केला होता. त्या घटनास्थळी रात्री दहा वाजेच्या सुमारास झरी जामणी येथील तहसिलदार देवकर, नायब तहसिलदार बोनगिनवार ही त्यांच्या ताब्यातील सरकारी वाहनाने रवाना झाले होते. वाटेत मोठमोठे खड्डे होते. त्यामुळे वाहन चालक वसंत सुर्यभान मडावी यांनी वस्तुस्थिती कथन करत वाहन पुढे जाणार नसल्याची कल्पना तहसीलदारांना दिली. त्यामुळे तहसीलदार वाहनातून उतरुन गावात पुढे पायी गेले. यावेळी वाहन चालक वसंत मडावी ही वाहनातच बसलेले होते.
त्यावेळी एका वाहनाने माजी आमदार विश्वास नांदेकर व त्यांच्यासोबत किशोर नांदेकर असे दोघे तहसीलदार वापरत असलेल्या सरकारी वाहनाजवळ आले. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी चालक वसंत मडावी यांना गाडी काढण्यास सांगितले. मात्र रस्त्यात खड्डे असल्यामुळे वाहन पुढे जाऊ शकत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी “चल मी आदेश देतो सरकार आमची आहे तहसिलदार ची गाडी आहे ना गाडी आमची आहे तुटली तरी तुटू दे मग पाहून घेऊ” असे म्हटले.
वाहन चालकाच्या सिटच्या बाजूने किशोर नांदेकर हे आले. त्यांनी वाहन चालक वसंत मडावी यांची कॉलर पकडून मारहाण केली तसेच सहन न होणारी शिवीगाळ केली. आपण माजी सैनिक असून मला अपमानित करुन मारहाण करु नका अशी विनंती चालक वसंत मडावी यांनी किशोर नांदेकर यांना केली. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन वणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक शासकीय अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी महत्वाचे पाच साक्षीदार तपासले. अभियोग पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने किशोर नांदेकर यांना शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पो. कॉ. अंकुश बोरकर यांनी कामकाज पाहिले.