रुमालामुळे लागला दुहेरी खूनाचा छडा; परेशने वाचला आपल्या गुन्ह्याचा धडा

घटनास्थळ

जळगाव : ओंकार पांडुरंग भारंबे हे ग्रामसेवक होते. राज्य शासनाची सेवा केल्यानंतर ते सन 1992 मधे सेवानिवृत्त झाले. ओंकार भारंबे यांच्याकडे जवळपास 5 ते 6 एकर शेती होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांना शासनाकडून पेन्शन मिळत होते. त्यांच्या दोन्ही मुलांना मुंबईत चांगल्या पदावर नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले मुंबई येथेच स्थायिक झाली.

एकंदरीत ओंकार भारंबे व त्यांची पत्नी सुमन भारंबे या दाम्पत्याने आपल्या जीवनातील सर्व जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. त्यांचे उर्वरीत जीवन व्यवस्थित सुरु होते. दोन्ही मुले मुंबईत असली तरी ओंकार भारंबे व त्यांची पत्नी सुमन भारंबे हे जेष्ठ नागरिक दाम्पत्य आपल्या गावी रोझोदा येथे रहात होते. ओंकार भारंबे यांचे वय 80 तर त्यांची पत्नी सुमन भारंबे यांचे वय 75 होते. वय झाले तरी दोघा जेष्ठ नागरिक दाम्पत्यांनी आपली तब्येत ब-यापैकी सांभाळली होती. वेळच्या वेळी ते आपल्या तब्येतीची काळजी घेत होते.

वयोमानानुसार ओंकार भारंबे यांना चालण्यासाठी वॉकर लागत होते. त्यामुळे ते कधी घरातील पलंगावर तर कधी घराच्या बाहेर ओट्यावर बसत असत. वयोमानानुसार त्यांना ऐकू देखील कमी प्रमाणात येत होते. जळगाव जिल्हयाच्या रावेर तालुक्यातील रोझोदा या गावी हे भारंबे दाम्पत्य रहात होते. रोझोदा येथे ते आपली शेती व घर सांभाळत होते. ते रहात असलेल्या घराजवळ एका परिवाराला कोरोनाची बाधा झाली होती.

त्यामुळे ते रहात असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला होता. या परिसरातील प्रत्येक घरातील सदस्यांची दररोज नियमीतपणे कोरोना तपासणी केली जात होती. दररोज सकाळी आरोग्यसेवक या परिसरात घरोघरी जावून प्रत्यकाची ऑक्सीजन लेव्हल व तपमान तपासत होते. जेष्ठ नागरिक भारंबे दाम्पत्य रहात असलेल्या घराजवळच परेश खुशाल भारंबे हा 32 वर्ष वयाचा तरुण रहात होता. तो नात्याने या भारंबे दाम्पत्याचा चुलत नातू होता. वयोवृद्ध ओंकार भारंबे घराबाहेर ओट्यावर बसण्यास आले म्हणजे परेश देखील त्यांच्याजवळ येवून बसत असे.

त्यामुळे नात्याने आजोबा असलेले ओंकार भारंबे व नातू परेश यांच्यात नेहमी इकडचे तिकडचे संभाषण होत असे. त्यातून परेश यास ओंकार भारंबे यांच्या ब-याच गोष्टी माहीत झाल्या होत्या. पेन्शनर असलेले ओंकार भारंबे यांनी कधी पेन्शन घेतली? किती घेतली असेल? त्यांच्या घरात किती रक्कम शिल्लक असेल? याचा अंदाज व मागोवा परेश घेत असे.   परेश हा इंजीनिअरींग डिप्लोमाच्या दुस-या वर्षाचा अ‍ॅपीअर विद्यार्थी होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. तसेच त्याचावर जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याचे देखील समजते.

आपल्यावर असलेले कर्ज फेडण्याची परेश यास चिंता होती. त्यातच त्याला दारु पिण्याचे देखील व्यसन होते. कर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. नात्याने आजोबा लागणा-या ओंकार भारंबे यांच्या घरात किमान पन्नास हजार रुपये असतीलच असा पक्का अंदाज परेश याने घेतला होता. ते पैसे आपल्याला मिळाले तर आपली आर्थिक अडचण दूर होवू शकते असा विचार परेश याने मनाशी केला होता.

त्यादृष्टीने तो अजून माहिती घेण्यासाठी ओंकार भारंबे यांच्याशी जवळीक साधून होता. तो त्यांच्या घराजवळच रहात होता. ओंकार बाबा घराच्या ओट्यावर येवून बसले म्हणजे परेश देखील त्यांच्याजवळ येवून त्यांची विचारपूस करण्यास येवून बसत असे.कर्ज फेडण्यासाठी ओंकार बाबा यांच्या घरातून रात्री पैसे व दागिने चोरी करण्याची आयडीया त्याच्या मनात आली. दोघांना जाग आल्यास ठार करण्याचा कुविचार देखील परेशच्या मनात सतत येत होता.

त्याच्यावर असलेला कर्जाचा डोंगर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्याच्या मनात कुविचारांनी थैमान घातले होते. त्यामुळे तो अस्वस्थ रहात होता. अखेर भारंबे दाम्पत्यांसाठी ती काळरात्र जवळ आली. नात्याने आपला चुलत नातूच काळ बनून आपला जीव  घेणार असल्याची कल्पना या जेष्ठ नागरीक दाम्पत्याला कशी येणार होती? नियतीची लेखणी कुणाला माहीत नसते. नियतीचा लेखा जोखा केवळ नियतीलाच माहीत असतो.

आपल्या जीवनात पुढे काय वाढून ठेवले आहे हे कुणालाही माहिती नसते. त्यामुळे वृद्धापकाळात जीवन व्यतीत करणा-या भारंबे दाम्पत्याला देखील नियतीचा लेखाजोखा माहीती नव्हता. बुधवार दि. 9 सप्टेबरच्या मध्यरात्री निरव शांततेत कुविचाराने ग्रासलेल्या परेश भारंबे याने सुरीसह चोरपावलांनी  ओंकार भारंबे यांच्या घरात प्रवेश केला. ओंकार भारंबे यांना निट चालता येत नाही व ऐकू देखील कमी येते या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचे परेशने ठरवले होते.

घरातील पैशांची शोधाशोध करत असतांना सुमन भारंबे या आजीला जाग आली. आजी सुमन भारंबे यांना जाग आल्यामुळे त्याने सर्वप्रथम सुरीसह आपला मोर्चा वयोवृद्ध सुमन भारंबे यांच्याकडे वळवला. नात्याने आजी असलेल्या वयोवृद्ध सुमन भारंबे या आजीच्या गळ्यातील मण्यांची पोत व हातातील बांगड्या त्याने हिसकावून घेतल्या. सुमन भारंबे या आजीने त्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली.

मात्र त्या वयोवृद्ध असल्यामुळे त्यांचा प्रतिकार कमी पडला. कुणाला समजू नये त्यापुर्वीच त्याने हातातील सुरीने त्यांच्या  पोटावर व गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाक खोलीत पडल्या. त्या आवाजाने झोपलेल्या ओंकार महाजन यांना जाग आली. तेवढ्या वेळात त्यांची पत्नी सुमन यांची हत्या झालेली होती. ओंकार  भारंबे यांना निट चालता येत नव्हते.

त्यांना चालण्यासाठी वॉकरची मदत घ्यावी लागत असे. त्यामुळे त्यांची हत्या करणे परेश यास सोपे गेले. परेशने त्यांची देखील सुरीने हत्या केली. त्यानंतर परेशने घरातील शिल्लक असलेले 54 हजार 340 रुपये रोख ताब्यात घेतले. रोख रक्कम, तुटलेल्या मण्यांची पोत व बांगड्या असा ऐवज घेवून त्याने गुपचूप तेथून पोबारा केला. दोघा जेष्ठ नागरीक दाम्पत्यांची हत्या केल्यानंतर परेश आपल्या घरी आला. मात्र त्याचा मळकट रुमाल घटनास्थळावर राहून गेला. हा रुमाल पुढील पोलिस तपासात एक महत्वाचा दुवा ठरला.

त्यानंतर गुरुवार 10 सप्टेबरचा दिवस उजाडला. सकाळी सर्व जण आपापल्या कामाला लागले. नेहमीप्रमाणे गावातील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक हारुन काझी कोवीड रुग्णांच्या तपासणीसाठी परिसरातील कंटेन्मेंट झोनमधे तपासणीसाठी आले. सकाळी साडेदहा वाजता आरोग्यसेवक भारंबे दाम्पत्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा लोटलेला दिसला.

सुरुवातीला आरोग्यसेवक हारुन काझी यांनी ओंकार बाबा यांना बाहेरुन आवाज दिला. दोन ते तीन वेळा आवाज देऊनही घरातून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आरोग्यसेवक काझी यांनी दरवाजा हळूच उघडला. समोर दिसलेले भयावह चित्र बघून आरोग्यसेवक काझी यांना शॉक बसला. दोघे जेष्ठ नागरिक दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसून आले. ओंकार भारंबे यांचा मृतदेह बेडरुममध्ये तर सुमनबाई यांचा मृतदेह स्वयंपाक घरात पडलेला होता.

आरोग्यसेवक काझी यांनी तात्काळ या घटनेची माहिती सरपंच व पोलिस पाटील वासुदेव हिवरे यांना दिली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळावर येवून घटनेची खात्री करुन घेतली. दरम्यान घटनास्थळावर परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिस पाटील हिवरे यांनी या घटनेची माहिती सावदा पोलिस स्टेशनला दिली. दुहेरी खूनाची माहिती मिळताच स.पो.नि. राहुल वाघ यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेबाबत त्यांनी वरिष्ठांना कळवले. गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत गुन्हा उघडकीस आणण्याकामी स.पो.नि. राहुल वाघ यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले. या घटनेप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 35/20 भा.द.वि.302 नुसार दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासकामी डीवायएसपी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बापू रोहोम, सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राहुल वाघ,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पो.हे.कॉ. पांडुरंग सपकाळे, विनोद पाटील,पो.ना.रिजवान पिंजारी, देवेंद्र पाटील, सुरेश अढायगे, संजीव चौधरी, मेहरबान तडवी, हेमराज भावसार, जगदिश पाटील, बाळु मराठे, विशाल खैरनार, योगेश सावळे, डॉग स्कॉडचे पो.ना.शेषराव राठोड, मनोज पाटील,

फॉरेन्सिक युनिट मधील पो.ना.किरण चौधरी, योगेश वराडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार राजेंद्र पाटील, विजय पाटील, शरीफोद्दीन काझी,अनिल इंगळे, राजेश मेंढे, संजय हिवरकर,रमेश चौधरी, संतोष मायकल, युनुस शेख, किशोर राठोड, नंदलाल पाटील, अरुण राजपुत, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे आदींचे पथक तपासकामी स्थापन करण्यात आले.

दरम्यान एका खब-याने स.पो.नि. राहुल वाघ यांना गोपनिय माहिती दिली की रोझोदा गावातील परेश खुशाल भांरबे  हा तरुण मयत ओंकार पांडुरंग भारंबे यांच्या घराजवळ रहात असून तो नेहमी त्यांच्या घरासमोर बसत होता. तो इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या सेकंड ईयरचा अ‍ॅपीयर विद्यार्थी असून त्याच्यावर व्यसनाधिनतेमुळे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. मयत ओंकार भारंबे यांच्याशी जास्त जवळीक साधणारा तोच तरुण होता. घटनेच्या आदल्या रात्री बराच वेळ दोघे मयत व परेश असे सोबत गप्पा करत बसले होते.

या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ यांनी परेश याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक हालचाली स.पो.नि. राहुल वाघ आपल्या पारखी नजरेने टिपत होते. मात्र त्याच्यावर आपला संशय असल्याचे स.पो.नि. राहुल वाघ यांनी त्याला समजू दिले नाही.

अंत्यविधीच्या सामानाची जमवाजमव करण्यासाठी परेशने लगबगीने धावपळ देखील सुरु केली होती. बोळवण आणणे, मंडप टाकणे, गोव-या आणणे आदी कामे त्याने मोठ्या लगबगीने करण्यास सुरुवात केली होती. आपल्यावर कुणाचा संशय येवू नये हा त्याचा हेतू होता. मात्र आपल्यावर स.पो.नि. यांची पारखी नजर आहे हे त्याला समजू शकले नाही.

घटनास्थळ असलेल्या मयत भारंबे दाम्पत्यांच्या घरात एक मळकट रुमाल पोलिस पथकाला आढळून आला. मयत ओंकार भारंबे यांचे घर अतिशय टापटीप व नीटनेटके असतांना हा मळकट रुमाल याठिकाणी कसा आला? तो रुमाल कुणातरी परक्या व्यक्तीचा असावा अशी शंकेची पाल पोलिसांच्या मनात चुकचुकली होती.

जळगाव येथून बोलावलेल्या हॅपी या श्वानाला प्रशिक्षक शेषराव राठोड व मनोज पाटील यांनी हा मळकट रुमाल दाखवला. त्या मळकट रुमालाचा वास घेतल्यानंतर श्वानाने आपला मोर्चा थेट परेश भारंबेच्या घरात नेला. तेथून पुढे शेजारी पडक्या घरात असलेल्या नोटांच्या बंडलाजवळ श्वानाने धाव घेतली. पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे परेशला चौकशीकामी ताब्यात घेतले.

सुरुवातीला आपल्याला काहीच माहिती नाही असे म्हणणारा परेश खाकीचे रत्न बघताच कबुल झाला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल करत रोख रक्कम 54 हजार 340 रुपये रोख, बांगड्या असा ऐवज काढून दिला. त्याने सुमन भारंबे यांच्याकडून हिसकावून घेतलेल्या बांगड्या या नकली अर्थात बेन्टेक्सच्या होत्या.

त्या ख-या असल्याचे त्याला वाटले होते. या बांगड्यांची चांगली किंमत मिळू शकते असा त्याला विश्वास वाटत होता. या गुन्ह्यात पोलिसांनी अटकेतील परेश याच्याकडून रोख रक्कम, सुरी व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्याच दिवशी या गुन्ह्याचा तपास पुर्ण करण्यात व आरोपी अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here