घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७) यांना पुणे पोलिसांच्या सायबर सेल शाखेने दि. १५ जुलै २०२५ रोजी दुपारी घाटंजी येथे येऊन ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये शैलेश नंदकिशोर वर्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(४), ३(५), ३५६ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता.
सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी त्यांचे ट्विटर (आताचे एक्स) अकाउंट @shailesh_varmaa यावरून आक्षेपार्ह आशय असलेले एक ट्विट शैलेश वर्मा यांनी रिट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले असले तरी, त्या रिट्विटच्या आधारे पुणे पोलिसांनी घाटंजी येथील सुवर्णकार शैलेश वर्मा विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
संशयित आरोपी शैलेश वर्मा यांनी आपली अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, १७ मे २०२५ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी घाटंजी येथे येऊन शैलेश वर्मा यांस ताब्यात घेतले. दि. १५ जुलै २०१५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास पुणे सायबर शाखेचे पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे आणि त्यांचे पथक घाटंजी येथे आले होते. संशयित आरोपी शैलेश वर्मा यांना घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये बोलावून नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पुणे पोलीसांना माहिती विचारली असता, पुणे पोलीसांनी माहिती देण्यास नकार दिला.




