गृहपयोगी संच न मिळाल्याने बांधकाम कामगारांचा तिव्र रोष

On: September 16, 2025 11:41 AM

यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : गृहोपयोगी वस्तूंचा संच घेण्यासाठी शिबीरात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवून रिकाम्या हाताने परत पाठवणा-या प्रशासनाचा मजुरांनी तिव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याबाबतचे निवेदन घाटंजी तालुक्यातील बांधकाम कामगारांनी निवासी नायब तहसीलदार विरेंद्र सोळंके यांच्याकडे दिले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांना गृहपयोगी वस्तुंचा संच वितरीत करण्यासाठी शेलु बुद्रुक (ता. पुसद) येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बोलावण्यात आलेल्या लाभार्थ्यांना दिवसभर थांबवून ठेवण्यात आले. मात्र रिकाम्या हाताने परत पाठवण्यात आले. याबाबत उपस्थित बांधकाम मजुरांनी निवासी नायब तहसीलदार विरेंद्र सोळंके यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून तिव्र निषेध आणि संताप व्यक्त केला आहे.

गृहोपयोगी वस्तुंचा संच वितरण व्यवस्थेत अभाव असल्याचे या घटनेतून समोर आले असून हा प्रश्न माजी आमदार बच्चु कडू यांनी अमरावती जिल्ह्याच्या दाभा येथील जाहीर सभेत देखील मांडला. शासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असून समाजात हा टिकेचा विषय झाला आहे. या कामाचा खासगी कंत्राट राज्यातील एका बड्या नेत्याच्या परिचिताला देण्यात आल असून संचाचा गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप देखील बच्चु कडू यांनी केला आहे.  

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी या शिबिराची गंभीर दखल घेऊन व सखोल चौकशी करून बेजबाबदारांवर अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आमडी येथील बांधकाम कामगारांनी शासनाकडे केली आहे. निवासी नायब तहसीलदार विरेंद्र सोळंके यांना दिलेल्या निवेदनावर आमडी येथील सारीका निकोडे, प्रभा निकोडे, अनुसया लेंडे, मृणाली निकम, संजीवनी राउत यासह विविध बांधकाम कामगारांच्या स्वाक्ष-या आहेत. सरकारने संच वितरणाची व्यवस्था योग्य पद्धतीने मार्गी लावली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ती मार्गी लावू असा इशारा देखील बच्चु कडू यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment