जळगाव – काही दिवसापूर्वी एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर काल 9 नोव्हेंबरच्या रात्री शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील कांचन नगरात गोळीबाराची दुसरी घटना घडली. या घटनेत एक ठार तर दोन जखमी झाले आहेत. जुन्या वादातून झालेल्या या घटनेत आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या याचा मृत्यू झाला असून गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याच्या मागवर आहेत.
फरार झालेला आकाश सपकाळे उर्फ डोया हा हद्दपार असतांना परिसरात आला होता. त्याच्यात आणि सागर सपकाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे. सध्या फरार झालेला आकाश रविवारी कांचन नगर परिसरात आला असता सुरु असलेली धुसफूस गोळीबाराच्या घटनेत रुपांतरित झाली.
आकाश याने सागरच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. यात सागर सपकाळे याचा भाचा गणेश सोनवणे यांच्या हाताला तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला दुखापत झाली. आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असतांना आकाश बाविस्कर याचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरु आहे.




