दहशतीच्या बळावर सागरला आला होता माज — टीकमच्या घावात संदीपने संपवले मनमानी राज   

On: January 4, 2026 9:45 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): सागर साहेबराव सोनवणे याची तो रहात असलेल्या निमखेडी या गावात मोठी दहशत होती. त्याच्यासोबत कुणी वाद घातला तर त्याला ते खपत नव्हते. त्याच्या हिटलरशाही वृत्तीमुळे त्याच्या नादी कुणी लागत नव्हते. जो कुणी त्याच्या नादी लागत असे त्याला तो हैरान करुन सोडत असे. त्यामुळे सहसा त्याच्यासोबत कुणी बोलत नसे. प्रत्येक जण त्याच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करत असे.

सागर सोनवणे याचे काही वर्षापुर्वी गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. सागर आणि त्या महिलेचे संबंध गावात चर्चेत आले होते. सागर सोनवणे याची दहशत आणी आपली इभ्रत लक्षात घेत ती महिला निमखेडी गाव सोडून दुस-या गावात राहण्यास निघून गेली होती. सागरच्या अशा मनमानी कारभारामुळे त्याच्या घरातील सदस्य त्याला पार वैतागले होते. त्याच्या अशा वृत्तीमुळे त्याचे लग्न जमण्यास अडचणी येत होत्या. “पालथ्या घड्यावर पाणी” या म्हणीप्रमाणे त्याला आई वडीलांनी समजावून देखील काही उपयोग झाला नाही.

निमखेडी या गावातच सागरचा एक मित्र होता. संदीप बाविस्कर असे त्या मित्राचे नाव होते. मित्र असलेल्या संदीप बाविस्कर याच्या अगदी जवळच्या नातेवाईक तरुणीसोबत देखील सागरने प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. अगदी जवळच्या नातलग तरुणीसोबत सागरने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यामुळे संदीपच्या घरात वादाची ठिणगी पडली होती. ती नातलग तरुणी देखील सागरच्या नादी लागल्यामुळे संदीप नाराज होता. मात्र गावात गुण्या गोविंदाने रहायचे असल्यामुळे हिटलरशाही वृत्तीच्या सागरपुढे त्याचा मित्र संदीप शांत होता.

mayat sagar sonawane

काही वर्षांनी सागरच्या त्या नातलग तरुणीचे लग्न जमले. ती सासरी नांदण्यास निघून गेली. मात्र तरीदेखील सागरचे तिच्यावर प्रेम सुरुच होते. काही वर्षांचा काळ उलटल्यानंतर संदीपची ती नातलग तरुणी पुन्हा निमखेडी या गावी माहेरी राहण्यास आली. त्यामुळे पुन्हा सागर त्या तरुणीच्या भेटीसाठी येऊ लागला. सागरचे चारित्र्य गावात सर्वांना समजून चुकले होते. त्यामुळे वयाची तिशी जवळ आली तरी त्याचे लग्न जमत नव्हते. त्याचा आडंदाड स्वभाव देखील त्याचे लग्न न जुळण्यास कारणीभुत होता. आडंदाड वृत्तीच्या सागर सोनवणे याच्यासह त्याच्या घरातील कुणाही सदस्याकडे साधा मोबाईल अथवा टीव्हीवरील चॅनल बघण्यासाठी लागणारे रिसीव्हर देखील नव्हते. प्रत्येकवेळी ते संदीपच्या मोबाईलचा वापर करत होते.

दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास सागर सोनवणे याच्या मेहुण्याला निमखेडी येथे टीव्हीवर मॅच बघण्यासाठी यायचे होते. त्यामुळे त्याने सागरचा मित्र संदीप याच्या मोबाईलवर फोन करुन सासरी निरोप देण्यास सांगितले. संदीप बाविस्कर याने त्याच्या मोबाईलसह सागरचे घर गाठून त्याच्या आईचे व जावयाचे बोलणे करुन दिले. आपल्याला टीव्हीवर मॅच बघण्यासाठी तुमच्याकडे यायचे आहे, तुमचा टीव्ही सुरु आहे का? अशी जावयाने सागरच्या आईला विचारणा केली. आमचा टीव्ही सुरु आहे मात्र आमच्या टीव्हीला रिसीव्हर नसल्याची खंत तिने व्यक्त केली. जावयाला टिव्हीवर मॅच बघायची असल्यामुळे सागरच्या आईने एका जणाला त्याच्या टिव्हीचा रिसीव्हर देण्याची संदीपच्या मोबाईलद्वारे विनंती केली. मात्र पलीकडून त्याने टिव्हीचा रिसीव्हर देण्यास नकार दिला. त्यामुळे सागर सोनवणे चिडला.

संदीप बाविस्कर याने घरी येऊन त्याच्या मोबाईलद्वारे त्याच्या आईचे जावयासोबत बोलणे करुन दिल्यानंतर टीव्हीच्या विषयावरुन वाद सुरु झाले होते. संदीपने त्याचा मोबाईल आपल्या घरी आणला नसता तर सर्व वादाच्या गोष्टी टळल्या असत्या असे सागरला वाटू लागले. तु आमच्या घरी वाद निर्माण करण्यासाठी मोबाईल घेऊन येतो का? असा उलट प्रश्न सागर सोनवणे याने संदीपला केला. वास्तविक यामधे संदीपची कोणतीही चुक नव्हती.

या वादात सागर सोनवणे याने संदीप बाविस्कर यास त्याच्या पायातील चपलेने मारहाण केली. सागर सोनवणे याची गावात दहशत असल्यामुळे त्याचा मित्र संदीप बाविस्कर हा सर्व प्रकार निमुटपणे सहन करत घरी आला. संतापाच्या भरात संदीप बाविस्कर याने मद्यप्राशन केले. सागर सोनवणे पुन्हा आपल्यासोबत वाद घालण्यासाठी येईल अशी शक्यता बळावल्याने संदीप बाविस्कर याने संतापाच्या भरात सागरला जन्माची अद्दल घडवण्याचा विचार केला. आपल्या जवळच्या नातलग तरुणीसोबत सागरचे सुरु असलेले प्रेम प्रकरण बघून संदीप मनातून चिडलेला होता. त्यामुळे वाटेत पडलेला रेती उपसण्याचा टीकाव संदीपने आपल्या ताब्यात घेतला होता.

काही वेळाने सागर सोनवणे हा रस्त्याने येतांना संदीपला दिसला. तो दिसताच संदीप बाविस्कर याच्या रागाचा पारा चढला. अगोदरच मद्यपान केलेल्या संदीपने मुखात गुटखा घेतला होता. त्यामुळे त्याला मळमळ होऊन उलटी झाली होती. रात्रीच्या वेळी संदीप घरी असतांना त्याला सागर सोनवणे घरी दुधाची पिशवी घेऊन जातांना दिसला. तो संदीप जवळ आला आणी त्याला शिवीगाळ करु लागला.

मद्यपान केलेल्या संदीपने सागर यास म्हटले की मी तुझी माफी मागून विनंती करतो की यापुढे तु माझ्या घरी येऊन माझ्याशी वाद घालत जाऊ नको. मात्र आडंदाड वृत्तीच्या सागरने संदीपला चापटा मारण्यास सुरुवात केली. आता मी तुझ्या घरी जाऊन जोरजोरात भांडण करतो असे म्हणत सागर पुढे जाऊ लागला.

सागरच्या अशा वागण्याचा आणी बोलण्याचा मद्याच्या नशेतील संदीपला राग आला. अगोदरच आपल्या जवळच्या नातेवाईक तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध आणी त्याच्याकडून नेहमी होणारी मारहाण या प्रकारामुळे संदीप पार वैतागला होता. याला वेळीच अद्दल घडवली नाही तर हा आपल्यासाठी कायमची डोकेदुखी होईल असा संदीपने विचार केला. संतापाच्या भरात संदीपने वाटेत ठेवलेला रेती उपसण्याचा टिकाव उचलून सागर सोनवणे याच्या मानेच्या खाली मारुन त्याला जमीनीवर पाडले. डोक्यावर आणी मागील बाजूने एकामागून एक हल्ले झाल्यामुळे जखमी सागर सोनवणे हा स्तब्ध होत रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. सागर सोनवणे हा अजिबात हालचाल करत नसल्याचे बघून संदीप बाविस्कर याने त्याच्या हातातील टीकाव उचलून नजीकच्या झाडा झुडूपात फेकुन दिला. सागर सोनवणे याने अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला होता. अशा प्रकारे आडंदाड वृत्ती असलेल्या सागर सोनवणे याचा अंत झाला.

सागरला जीवे ठार केल्यानंतर संदीप वाटेतील शेकोटीजवळ गेला. त्याठिकाणी असलेल्या एका जणाला त्याने सर्व हकीकत कथन केली. त्यानंतर पुढे गेल्यावर त्याला सागरची आई भेटली. तिने त्याला सागर कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर आपणास काही माहिती नाही असे उत्तर देत त्याने घर गाठून झोपी जाण्यास प्राधान्य दिले. 

दरम्यानच्या कालावधीत कुणी तरी सागर आणी संदीप या दोघांमधे कडाक्याचा वाद झाल्याची माहिती तालुका पोलिसांना दिली. तसेच गावात देखील या घटनेची वार्ता पसरली. गावक-यांनी लागलीच मयत अवस्थेतील सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी सागर यास तपासून मयत घोषित केले. जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या सहका-यांनी लागलीच रुग्णालयात आणी घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित करत कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.

सागर सोनवणे याचा भाऊ विशाल सोनवणे व इतर नातेवाईकांनी संदीप बाविस्कर याचे घर गाठून त्याला घराबाहेर येण्यास भाग पाडले. संदीप घराबाहेर येताच जमावाने त्याला चोप देण्यास सुरुवात केली. तुम्ही लोक मला का मारहाण करत आहात असा प्रश्न त्याने सर्वांना केला. सागर सोनवणे याला का मारले असा त्याला प्रतिप्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी सागरला मारले नसून आनंदा उर्फ उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे याने त्याला मारल्याचे सांगून संदीपने वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

काही वेळाने जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पथक संदीप बाविस्कर याच्या घरी येऊन धडकले. त्यांनी संदीप बाविस्कर याला ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले. आपण सागरला मारले नसून त्याला आनंदा उर्फ शेट्टी नन्नवरे यानेच मारले असल्याची खोटी माहिती संदीपने पोलिसांना दिली. आपण केलेल्या मारहाणीत सागर सोनवणे याचा मृत्यु झाल्याचे संदीपला समजले होते. या घटनेबाबत मयत सागर सोनवणे याचा भाऊ विशाल सोनवणे याने जळगाव तालुका पोलिस स्टेशनला संदीप बाविस्कर आणि आनंदा उर्फ शेट्टी या दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. गु.र.न. 373/2025 भारतीय न्याय संहिता 103 (1), 3 (5) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला.

नात्यातील तरुणीसोबत सागरचे असलेले प्रेम संबंध आणी तिचे लग्न झाल्यानंतर देखील त्याचे घराकडे सतत येणे आणी त्याची सुरु असलेली दांडगाई व सततची मारहाण संदीपला खटकत होती. त्यातून संदीप बाविस्कर याने सागर सोनवणे याची हत्या केली. या हत्येमागे संशयीत आनंदा उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे याचा कितपत सहभाग आहे याची देखील खातरजमा अधिक तपासात केली जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, स.पो.नि. अनंत अहिरे व त्यांचे सहकारी हे.कॉ. प्रदीप राजपूत तसेच हे.कॉ. रामकृष्ण इंगळे, धनराज पाटील, गुलाब माळी, पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी, कैलास इंगळे, प्रविण पाटील, पो.कॉ. दिपक पाटील, गणेश पाटील आदी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment