जळगाव : अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली सायन्स एक्झिबिशन ही केवळ शालेय उपक्रमापुरती मर्यादित न राहता समाजोपयोगी विज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची स्पष्ट दिशा दाखवणारी ठरली. प्रत्येक प्रकल्पामध्ये कल्पकता, संशोधन वृत्ती आणि सामाजिक भान यांचा समतोल दिसून आला.

रस्ते अपघात रोखण्यासाठी सादर करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाने विशेष लक्ष वेधले. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी तयार केलेल्या सेन्सर-आधारित डिटेक्टरमुळे मद्यसेवन झाल्याचे निदर्शनास येताच इशारा मिळतो आणि वाहनाचे इंजिन बंद होते. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीस योग्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
याच विषयावर दुसऱ्या गटाने वाहन दरीत कोसळू नये यासाठी सेन्सर तंत्रज्ञान सादर केले. धोकादायक वळणावर किंवा रस्त्याच्या कडेला वाहन पोहोचताच चालकाला त्वरित इशारा मिळतो. “दररोज अपघातांच्या बातम्या वाचताना काहीतरी उपाय शोधावा, हीच या प्रकल्पामागची प्रेरणा आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
अंतराळ संशोधनावरील प्रकल्पांतून भारताच्या मंगळयान मोहिमेचा गौरव करण्यात आला. मंगळ ग्रहावर यशस्वीरीत्या पोहोचलेले यान भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे विद्यार्थ्यांनी ठळकपणे मांडले. “मंगळयान आम्हाला स्वप्न पाहायला आणि विज्ञानात पुढे जायला प्रेरणा देते,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या सायन्स एक्झिबिशनचा समारोप आज झाला. समारोपाच्या दिवशी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांनी प्रदर्शनास भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे बारकाईने निरीक्षण केले. परीक्षक म्हणून डॉ. बी. के. यादव, सतीश खडसे आणि संकेत जोशी यांनी प्रकल्पांचे परीक्षण केले.
शहरासह जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली. अनुभूती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि संशोधनाची आवड निर्माण होत असून उद्याचे जबाबदार संशोधक घडविण्याचा शाळेचा प्रयत्न यानिमित्ताने अधोरेखित झाला.






