चौघांच्या हत्याकांडाचा चिठ्ठीने झाला उलगडा- सातारा पोलिसांनी लावला गुढ खूनांचा छडा

सातारा

विश्वासराव पानिपतच्या लढाईत मारले गेले. तेंव्हापासून जेव्हा जेव्हा कुणावर विश्वास ठेवण्याची वेळ येते अथवा विश्वासाच्या विषयावर चर्चा होते त्यावेळी विश्वासरावांचे उदाहरण दिले जाते. एका दृष्टीने ते अगदी खरे आहे. आजकाल कुणावरही सहजासहजी विश्वास टाकू नये. कारण कोण केव्हा व कोणत्या रुपात फसवणूक करेल हे सांगता येत नाही. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे.

११ ऑगस्ट २०२० रोजी मेढा गावापासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर असणाऱ्या भिलार नजीक मार्ली घाटातुन मार्गक्रमण करणा-यांना एक उग्र दर्प येत होता. काही जणांनी याची माहिती जावळी पोलीसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना घाटातील खोल दरीत एक मानवी सांगडा असल्याचे दिसून आले.

पोलीसांनी तातडीने महाबळेश्वर ट्रॅकर्सला बोलावून तो मानवी सांगडा बाहेर काढून तपासाला सुरुवात केली. त्या मृत सांगडयाजवळ पोलीसांना एक हिशोबाची चिठ्ठी आणि मोबाईल नंबर लिहिलेला कागद आढळला. त्यावरुन पोलीस तपास करत असताना परत दि. १३ ऑगस्ट रोजी पोलीसांना त्याच घटनास्थळी पुढे काही अंतरावर आणखी एक मानवी सांगडा मिळाला होता. पोलीसांनी हे दोन्ही सांगाडे रासायनिक लॅबला पृथ्थकरणासाठी पुणे येथे पाठवून दिले.  या दोन्ही सागाड्यांपैकी एक सांगाडा पुरुषाचा  तर दुसरा महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीसांना मोबाईल नंबर लिहिलेली चिठी मिळालेली होती. त्यावरुन पोलीस जवळपास वीस दिवस तपास करत होते. जावळीच्या परिसरासह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हयातून कुणी बेपत्ता आहे का याची चौकशी सुरु होती. तपासादरम्यान पोलीसाना सांगली जिल्हयातील कुपवाड पोलीस स्टेशनमध्ये एक पुरुष, एक महिला तसेच दोन तरुण असे एकाच कुटूंबातील चार जण सांगली जिल्हयातील बामनोली गावातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

मयत पुरुषांच्या नातेवाईकांना मिळालेला मानवी सांगडा आणि त्यावरील जीर्ण झालेले कपडे तसेच इतर वस्तु दाखवण्यात आल्या. नातेवाईकांनी त्या वस्तु ओळखून मयत पुरुष हा बामनोली येथील दत्तनगर भागात राहणारे तानाजी जाधव (५५)आणि महिला मंदाकिनी जाधव ( ५०) असे असल्याची माहिती मिळाली. तसेच या जाधव कुंटुबातील त्याची तरुण मुले तुषार जाधव आणि विशाल जाधव हे देखील गेल्या महिन्यापासून अनाकलनीय गुढ पध्दतीने बेपत्ता असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

जावळी पोलीसांनी यासंबधी कुपवाड पोलीसांकडून माहिती घेत पुढील तपासाला सुरुवात केली असता, या चौघांचीही हत्या झाल्याचे तपासात पुढे आले. त्यातील दोन्ही सांगाडे मार्ली घाटात पोलीसाना मिळून आले होते. या घटनेने पोलीस देखील चक्रावून गेले होते. चार जणांची कुणी हत्या केली? आणि ती कोणत्या कारणातून केली?  या चार जणांचा मारेकरी कोण? याचा उलघडा पोलीस करत होते. तपासाअंती तब्बल विस दिवसांनी या चौघांच्या गुढ हत्येचा उलगडा करण्यात पोलीसांना यश आले.

सांगली जिल्हयातील बामनोली येथील दत्तनगर भागात तानाजी जाधव हे आपल्या कुंटूंबासह रहात होते. ते कुपवाड एमआयडीसीत  एका कारखाण्यात कामाला होते. त्याचे मुळ गाव तासगाव तालुक्यातील सोनी धुळगाव असून तेथे त्यांची शेती आहे. ती शेती त्याचा मोठा भाऊ करतो. गेल्या पंचवीस वर्षापासून ते आपल्या पत्नी मुलासह बामनोली येथे रहात होते. त्याची दोन्ही मुले विशाल आणि तुषार शिकून मोठी झाली होती. ते दोघे ही सैन्यात दाखल होणार होते. तशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच ते त्या प्रयत्नात होते.

याचवेळी ते दोघे कवठेमहंकाळ तालुक्यातील आगळगाव येथील एका निवृत सैनिकांच्या सपंर्कात आले. त्या निवृत सैनिकाचा पुतण्या नेहमी आगळगाव येथे येत होता. तो पुतण्या म्हणजे जावळी तालुक्यातील सोमी (शेते) येथील योगेश मधुकर निकम होता. तो गेल्या काही वर्षापूर्वी सैन्यात दाखल झाला होता. त्याला सैन्य भरतीची प्रक्रिया माहित होती. त्याचा संपर्क विशाल आणि तुषार याच्याशी आला होता. या दोघा भावांना सैन्यात दाखल व्हायचे असल्याचे त्याने ओळखले होते.

त्याची या दोघांसोबत काही वेळा भेट झाली होती. भेटी दरम्यान त्याने दोघांना सांगितले होते की सैन्यात दाखल व्हायचे असेल तर किमान दोन लाख रूपये दयावे लागतील आणि हे काम फक्त ओळखीने होते. माझी ओळख  अशा मध्यस्थ व्यक्तीशी आहे की तुमचे काम पैसे दिल्यानंतर सहज होईल.

.त्या दोघांनी घरात विचार विनिमय आई वडीलांसोबत विचार विनीमय केला. सर्वांनी मिळून योगेश निकम याचे सेवानिवृत्त काकासोबत चर्चा केली. त्यानंतर विचाराअंती योगेश निकम यास पैसे देण्याचे ठरवले. ठरल्यानुसार त्याला दिड लाख रुपये त्यांनी योगेश निकम यास दिले. अगोदर विशाल यास नोकरी लावतो नंतर तुषार यास लावतो त्यासाठी अजून रक्कम तयार ठेवण्यास योगेशने त्यांना सांगितले.

मिळालेली दिड लाख रुपयांची रक्कम घेवून योगेश निकम घेवून गेला. त्यानंतर मात्र तो जाधव परिवाराच्या संपर्कात आलाच नाही. आपली पोस्टींग लांब झाली असल्याचे खोटे सांगून तो त्यांची फसवणूक करत होता. विशाल व तुषार या दोघा भावांनी त्याच्याशी वारंवार फोनवर संपर्क साधला असता पलीकडून योगेश म्हणत असे की मी तुमचे पैसे पुढच्या व्यक्तीला दिले आहेत. त्याचा निरोप आला म्हणजे तुमचे काम होणार आहे.

सुरुवातील त्याच्या बोलण्यावर दोघा भावांनी विश्वास ठेवला. मात्र नंतर बरेच दिवस झाले तरी तो त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर दोघा भावांच्या असे लक्षात आले की आपली शुद्ध फसवणूक झाली आहे.अखेर दोघा भावांनी त्याला आपले दिलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली.  

दररोज दोघा भावांचा पैसे परत मागण्याचा तगादा सुरु झाल्यामुळे योगेश वैतागला. आता काय करावे हे योगेश यास सुचत नव्हते. त्याने ते पैसे व्यक्तिगत कामासाठी खर्च केले होते. त्यांना घेतलेले दिड लाख रुपयांची रक्कम कुठून द्यावी हा प्रश्न त्याला सतावत होता.

या समस्येतून सुटण्यासाठी त्याने वेगळाच विचार सुरु केला. पैसे परत देतो असे म्हणत त्याने दोघांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आपल्या सोमर्डी (शेते) येथील घरात बोलावून घेतले. दोघे तेथे आल्यावर त्याने सुरुवातीला त्यांना जेवणास बसवले. जेवण करतांना त्याने त्यांच्या अन्नात विष घातले. त्या विषाचा देखील त्यांच्यावर परिणाम होत नसल्याचे बघून त्याने दोघांना गोड बोलून घराच्या गच्चीवर बोलावून घेतले. तेथे दोघांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. दोघांच्या डोक्यात प्रहार होताच त्यांच्या डोक्यातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला व ते जागीच मृत्यूमुखी पडले. त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात येताच योगेशने त्या दोघांना आपल्या कारमध्ये घालून रात्रीच्या वेळी भिलार मार्ली घाटात खोल दरीत आणून टाकले होते. त्या दोघांचा खून केल्यानंतर तो निर्धास्त झाला होता.

आपली दोन्ही मुले योगेश निकम याच्याकडे पैशासाठी गेली असून चार दिवस झाले तरी परत आली नाही म्हणून  त्यांचे आईवडील हैरान झाले. दोघा मयत भावंडाचे वडील तानाजी जाधव यांनी त्यांना फोनवर विचारणा केली असता ते दोघे मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात आले.

परंतु दिड महिना उलटला तरी देखील मुले परत आली नाही म्हणून तानाजी जाधव यांचा योगेशवरील संशय बळावला. त्यांनी योगेश याच्याकडे सखोल चौकशी सुरु केली. तुमची दोघा मुलांसोबत मुंबईत भेट घालून देतो असे म्हणत योगेशने त्यांना सोमर्डी (शेते) येथे बोलावून घेतले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तानाजी जाधव हे आपली पत्नी मंदाकिनी सोबत त्याच्याकडे ७ ऑगस्ट रोजी गेले. त्या रात्री त्याने तशाच पद्धतीने तानाजी जाधव व मंदाकिनी जाधव यांना जेवणातून विष घालून जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. त्या विषामुळे दोघांना अस्वस्थ होत असले तरी त्यांचा मृत्यू लवकर होत नव्हता. त्यामुळे योगेश याने दोघांच्या डोक्यात लोखंडी घाव घालून त्यांना देखील मारुन टाकले. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह त्याने आपल्या गाडीत घालून परत मार्ली घाटात खोल दरीत नेऊन टाकले.अशा प्रकारे त्याने दीड लाख रुपयांच्या तगाद्यापासून वाचण्यासाठी एकाच परिवारातील चौघांचे खून करुन आपल्या माथी पाप वाढवून घेतले.

११ तारखेला तानाजी जाधव यांचा मृतदेह कुजलेल्या स्थिीतीत मिळाला होता. त्यांच्या मृतदेहाशेजारी मोबाईल नबंर लिहिलेली चिठी आणि एक हिशोबाची चिठ्ठी मिळाली होती. त्या चिठ्ठीवरुन पोलीस तपास सरकत सरकत आता सोमर्डी (शेते ) येथील योगेश निकम याच्या घर पर्यंत पोहचला होता.त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसी खाक्या बघून त्याने आपला गुन्हा कबुल केला. 

त्याने पोलीसांना दिलेली माहिती चक्रावून टाकणारी होती. योगेश निकम याचे शिक्षण बारावी पर्यत झाले आहे.  सुरुवातीला तो कुडाळ येथील नवजीवन विदयालयात कामाला होता. तेथे त्याने पैशांची अफरातफर केल्याने त्याला कामावरुन कमी करण्यात आले होते. त्यांनतर त्याने संस्थाचालक रोहिणी निंबाळकर याना जातीवाचक शिवी दिली होती. त्यांनी त्याच्या विरोधात अफरातफरीची केस दाखल केल्याने तो त्यांच्यावर चिडला होता. त्याने संस्थाचालक निंबाळकर यांना आपण कुंटूबासह आत्महत्या करणार असल्याची धमकी देखील दिली होती. तो स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर स्वत:ला  माजी सैनिक असल्याचे भासवत असे. सैनिकाच्या ड्रेसमधील फोटो देखील त्याने टाकला होता. त्यामुळे बरेच जण त्याला सैनिक समजत होते.

पोलीसांनी तानाजी जाधव (५५), मंदाकिनी जाधव (५०), तुषार जाधव (२६) आणि विशाल जाधव (२०) सर्व रा. बामनोली ता.मिरज जिल्हा सांगली यांच्या खूनाच्या आरोपा खाली योगेश मधुकर निकम ( ३८) रा.सोमर्डी (शेते) याच्या विरोधात भा.दं.वी.कलम ३०२, २०१. ४२० सह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा तपास सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अशोक पाटील, स.पो.नि.आनंदसिंग साबळे, पोलिस उप निरिक्षक संतोष चामे, पी.एच घोरपडे, सुर्यकांत शिंदे, विनोद गायकवाड, मुबीन मुलानी, संजय शिर्के, नंदकुमार महाडिक, सुनिल भिंगारे, राजकुमार नन्नवरे, योगेश पोळ प्रविण कडव, जितेंद्र शिंदे, दतात्रय शिंदे, रोहित बाबर, सनी काळ, इम्रान मेटकरी, पकंज बेसके, गणेश कचरे, डी.जी शिंदे आदिंनी पुर्ण केला.

सध्याच्या काळात विश्वास ठेवायचा तरी कुणावर व का असा प्रश्न निर्माण होतो. या विश्वासाने अनेकांचा घात झाला आहे. परंतू गरज ही प्रत्येकाला असते. त्या गरजेपोटी मनुष्य काही प्रमाणात विश्वास ठेवत असतो. मात्र त्यातून काही लोक घात करतात. त्यातून विश्वासाला तडा जाते. त्यातून खूनाच्या घटना देखील घडत असतात. डोळे झाकून कुणावर विश्वास ठेवू नका. या जगात जागोजागी योगेश निकम सारखी माणसे टपून बसलेली असतात. सदा सर्वदा चिती सावध असावे हेच खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here