जळगाव : जळगाव शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांची चोपडा शहर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील संजय गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. चोपडा शहरातील गोरक्षकांचा वाद पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना भोवला असल्याचे या बदलीच्या निमीत्ताने म्हटले जात आहे. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांची चोपडा शहर येथून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.


पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारला असून संजय गायकवाड यांनी वाहतुक शाखेचा पदभार अद्याप स्विकारलेला नाही. ते लवकरच वाहतुक शाखेची जबाबदारी हाती घेणार आहेत. काही दिवसांपुर्वी शनीपेठ पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची देखील नियंत्रण कक्षात बदली झाली. या बदलीमागे विनोद अहिरे या पोलिस कर्मीने तक्रारदाराकडून घेतलेली एक लाख रुपयांची लाच आणि यापुर्वी पोलिस स्टेशनमधे झालेल्या हाणामारीची किनार असल्याचे बोलले जात आहे.
चोपडा येथे गो तस्करांकडून गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक मधुकर साळवे याच्या निलंबनाची मागणी हिंदूत्ववादी संघटनांकडून काढलेल्या मोर्चात करण्यात आली होती. या घटनेची परिणीती म्हणून त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. दरम्यान राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी याप्रकरणाची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीष महाजन यांच्या कडे तक्रार केली होती.






