जळगाव : जळगाव शहरातील वाहतूक शिस्तीबाबत कठोर पावले उचलत जळगाव शहर वाहतूक शाखेकडून सन २०२६ मध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी, बुलेट सायलेन्सर आणि अवैधरित्या लावलेल्या फॅन्सी नंबर प्लेटवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी तपासणीदरम्यान सुमारे १०० दुचाकींचे सायलेन्सर तपासले असता ते संबंधित वाहनधारकांनी वाहन खरेदीनंतर बदलून त्या ऐवजी कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवल्याचे आढळले. या आवाजामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने पोलिसांनी हे सर्व सायलेन्सर जप्त केले.
यासोबतच शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनधारकांविरुद्धही कारवाई करत सुमारे २५० नंबर प्लेट ताब्यात घेण्यात आल्या. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये जप्त केलेले सायलेन्सर रोड रोलरच्या सहाय्याने चेपून निकामी करण्यात आले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ९३९ अपघात झाले असून त्यापैकी ४५० प्राणांतिक अपघातांमध्ये सुमारे ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार विना हेल्मेट वाहन चालवणे, ट्रिपल सीट, अल्पवयीन चालक, रॅश ड्रायव्हिंग, बेशिस्त वाहनचालक, नो पार्किंग उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, राँग साइड ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे तसेच कर्कश सायलेन्सर वापरणे यांसारख्या प्रकारांवर विशेष पथकांमार्फत कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यरत असून ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी जिल्हा’ करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून जनजागृती आणि कारवाई यांचा समन्वय साधत ही मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून होणाऱ्या कारवाईपासून सावध राहावे, असे आवाहन जळगाव पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








