जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल

On: April 25, 2026 7:32 PM

जळगाव दि. २५ प्रतिनिधी – कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा महासंग्रामाची ग्रॅण्ड फायनल रविवारी दि.२६ रोजी होणार आहे. रात्री ७.३० वाजेपासून सामन्याला सुरवात होईल. सामना संपल्यानंतर लाखोंची पारितोषिके पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुंबईचे मयंक पारिख, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सर्व पदाधिकारी, तसेच जळगाव क्रिकेट लीग चे सर्व सहकारी व संघ मालकांसह मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. संपूर्ण जेसीएल मध्ये मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला पगारिया ऑटो तर्फे ‘पल्सर’ बाईक दिली जाणार आहे.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह वैयक्तिक कामगिरीसाठी चॅम्पियन्स, (विजेता), उपविजेता, ३rd प्लेस, ४th प्लेस, फेयर प्ले पुरस्कार, प्लेयर ऑफ द लीग, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतील सगळ्यात अधिक षटकार, स्पर्धेतील सगळ्यात अधिक निर्धाव चेंडू,
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल या विशेष पुरस्कारांनी सम्मानित केले. विजेत्या संघास २ लाख रुपये रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी, तर उपविजेत्या संघास १ लाख रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल.

संघांच्या कामगिरीनुसार इन्सेंटिव्ह – जळगाव कोगटा किंग्ज, रावेर रॉयल्स, जामनेर सातपुडा हिरोज, अमळनेर सुहांस जायंट, पाचोरा एसकेटी योद्धाज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स या सहा संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या प्रत्येक संघाला त्या त्या संघांच्या कामगिरीनुसार इन्सेटिंव्ह रक्कम रोख पारितोषीक स्वरूपात मिळेल. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून प्रत्येक संघाला प्रोत्साहन मिळावे म्हणून इन्सेंटिव्ह रक्कम जाहिर केली आहे. जेणे करुन संघाला काहीनाकाही मिळेल.

एलिमिनेटर च्या सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज विजयी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेच्या जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर एलिमिनेटर चा सामना अत्यंत चुरशीचा झाला. यात अवघ्या दोन धावांनी जामनेर सातपुडा हिरोज ने विजयाची मोहर उमटवली. या विजयासह क्लालिफायर दोन मध्ये जळगाव कोगटा किंग्ज संघासोबत ग्रॅण्ड फायनल साठी त्यांची लढत रात्री रंगणार आहे. एलिमिनेटरच्या सामन्यासाठी वर्धमान हॉस्पीटलचे संचालक डॉ. सुनिल नाहटा यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकून जामनेरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. जामनेरच्या डावाची सुरवात डगमगत झाली. २२ धावांवर पहिली विकेट पडली. त्यानंतर ठराविक अंतराने ३५, ४६ व ७२ धावांवर गडी बाद होत राहिले. संघ सतत दडपणाखाली असताना राम राठोड, माणस पाटील, क्रीषी नाथानी यांनी डावाला आकार दिला व जामनेर सातपुडा हिरोज् संघाने २० षटकांत ८ बाद १५० धावा केल्यात. यामध्ये रामकृष्ण राठोडने जबाबदारी खेळी करत २३ चेंडूत नाबाद ३४ धावा फटकावल्या.

जामनेर सातपुडा हिरोजच्या डावात ८ गडी १२१ धावांत बाद झाले असताना शेवटच्या फळीतील खेळाडूंनी केलेल्या छोट्या खेळींमुळे संघाला आव्हानात्मक धाव संख्या उभारता आली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघाकडून कार्तिक बाटुंगेने ३ षटकांत १७ धावांत २ बळी घेतले. अभि पाटीलने २ षटकांत १४ धावांत २ गडी बाद केले. अमेय कोळी, ओम मुंडे, लोकेश पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. प्रत्युत्तरात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने संयमी खेळ दाखवित सुरवातीपासून सामन्यावर पकड मिळवली. एक बाजूने ठरावीक अंतराने बळी जात असताना कर्णधार ओम मुंडेने नाबाद राहत ६० चेंडूत ७ चौकार, १ षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. मात्र साहिल गायकर, प्रशांत ढोले भोपळाही न फोडता तंबूत परतल्याने सामना जामनेर सातपुडा हिरोजच्या बाजूने झुकला. जामनेर सातपुडा हिरोज् चे गोलंदाज ललित पाटील ने २ तर शतायू कुलकर्णी, अर्शद खान, राम राठोड, नितलेश चौधरी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. चुरशीच्या खेळीत चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सला ६ गडींच्या मोबदल्यात २० षटकात १४८ धावांवर रोखले. जामनेर सातपुडा हिरोज् ने क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यासाठी प्रवेश मिळविला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment