जळगाव : गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे मुख्य संचालक, ब्रँच मॅनेजर, संचालक व एजंटांविरुद्ध जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल शालिकराम पाटील (रा. जळगाव) यांनी TWJ असोसिएट्स प्रा. लि. पुणे या कंपनीत मुख्य संचालक व इतर संचालक यांच्या मदतीने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी सेमिनार, मिटिंग आणि प्रचार कार्यक्रम आयोजित केले होते. कंपनीत गुंतवणूक केल्यास निश्चित आणि आकर्षक परतावा मिळेल, असे सांगून अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली होती.
तपासात उघडकीस आले की, कंपनीने जवळपास २७९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपये जमा करून घेतले. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा किंवा मूळ रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ६१(२) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी म्हणून निर्मल शालिकराम पाटील यांच्यासह कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नांवकर, नेहा समीर नांवकर, शैलेश देसले, संकेश साखरे यांच्यासह विविध शाखांतील एजंट आणि पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. काही आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश फड, पोहेका रविंद्र परदेशी व पोहेका विकास पहुरकर हे करत आहेत. दरम्यान, TWJ असोसिएट्स प्रा. लि. जळगाव शाखेमार्फत गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आपली माहिती व संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





