चोरीच्या ट्रॅक्टरसह दोघे चोरटे ताब्यात

On: May 16, 2026 8:43 PM

जळगाव : एरंडोल परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने कौशल्यपूर्वक तपास करत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एरंडोल पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले तब्बल 3 लाख 25 हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन येथे गु.रजि.क्र. 44/2026 व गु.रजि.क्र. 84/2026 असे ट्रॅक्टर चोरीचे सलग दोन गुन्हे दाखल झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून गुन्ह्यांचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे विखरण (ता. एरंडोल) येथील विकी देवरे व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी हे दोन्ही गुन्हे गणेश भिकन गोसावी व प्रविण भाईदास कोळी (दोघे रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्या साथीने केल्याची त्यांनी कबुली दिली.

पोलीसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले एकूण 3 लाख 25 हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त केले असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये फौजदार जितेंद्र वल्टे, हवालदार संदीप रमेश पाटील, प्रवीण जनार्दन मांडोळे, हरीलाल लक्ष्मण पाटील, राहुल नथू कोळी, महेश मुरलीधर पाटील, पो कॉ सागर गुलाब पाटील, भूषण जगदीश शेलार व बाबासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment