जैन इरिगेशनमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

On: May 30, 2026 8:13 PM

जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) : तंबाखूचे सेवन हे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारे असून व्यसनामुळे केवळ एक व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न, आनंद आणि भवितव्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे तंबाखू व इतर सर्व व्यसनांना ठामपणे ‘नाही’ म्हणत निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राचे संचालक लाईफ कोच, वक्ता नितीन विसपुते यांनी केले.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.तर्फे शनिवारी (दि. ३०) जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी (ज्ञानालय) डेमो हॉलमध्ये तसेच फूड पार्क येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी साजरा होतो परंतु हा दिवस एक दिवस आधीच साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. एम. भट होते. कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे फुडपार्क येथील कार्यक्रमात डॉ हिमांशू भारद्वाज हे अध्यक्षस्थानी होते. डॉ अरुण चौधरी, भिकेश जोशी, वैभव चौधरी, अजय काबरा या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बांभोरी येथे प्रास्ताविक करताना कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशू भारद्वाज यांनी तंबाखू व त्याच्या विविध उत्पादनांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. तंबाखूमुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग तसेच यकृत, मूत्रपिंड, तोंड आणि घशाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय श्वसनाचे विकार, दातांचे नुकसान, दृष्टीदोष आणि अकाली मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे सांगितले.

मार्गदर्शन करताना नितीन विसपुते यांनी ‘आजचा दिवस माझा आहे’ हा मंत्र अंगीकारून व्यसनमुक्तीची सुरुवात करण्याचे आवाहन केले. नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे, सकारात्मक विचार, चांगली मित्रमंडळी आणि कुटुंबाशी सुसंवाद यामुळे व्यसनांपासून दूर राहणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ई-सिगारेटही आरोग्यासाठी तितकीच घातक असून तिच्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल’ या संकल्पनेतून तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश देताना त्यांनी नियमित चालणे, पायऱ्या चढणे आणि शारीरिक हालचाली वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तंबाखूमुळे ताण कमी होतो हा समज चुकीचा असून निकोटीनमुळे ताण आणि अस्वस्थता वाढते. व्यसनमुक्त झाल्यास मानसिक शांतता, चांगली झोप, आर्थिक बचत आणि कुटुंबाला निरोगी आयुष्याचा आनंद मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.यावेळी उपस्थितांना तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थ न खाण्याची शपथ देखील देण्यात आली.

कार्यक्रमात मराठी गीतांच्या माध्यमातून व्यायाम व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी अनोखी संकल्पना विशेष आकर्षण ठरली. ‘व्यसनांना नाही म्हणण्यासाठी मानेचा व्यायाम करा’ असा संदेश देत उपस्थितांना प्रत्यक्ष सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात आले. ‘पिटो टेक्निक’च्या माध्यमातून संगीत, नृत्य आणि आनंद यांचा उपयोग मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीसाठी कसा होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक विसपुते यांच्याद्वारे सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment