जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुली दरम्यान काही ढाबे, हॉटेल्स व खानावळी रात्रभर सुरू राहत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. या मार्गावरील अधिकृत तसेच काही अनधिकृत आस्थापनांवर रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वर्दळ असते. प्रवासी, वाहनचालक आणि खाद्यप्रेमींसाठी ही ठिकाणे सोयीची ठरत असली तरी काही ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनाही येथे वेळ घालवण्यासाठी सहज वाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. जनता निद्रेच्या अधीन झाल्यानंतर गुन्हेगारी कर्माला सुरुवात होते असे म्हटले जाते.
स्थानिक स्तरावर व्यक्त होत असलेल्या मतानुसार, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या काही ढाब्यांवर जेवणाच्या निमित्ताने संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणावर थांबत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शासनाच्या नव्या नियमावलीनुसार अधिकृत आस्थापनांना रात्रभर व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जर कोणतीही अनधिकृत आस्थापना नियमांचे उल्लंघन करून कार्यरत असेल आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असतील, तर संबंधित यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जळगावच्या अजिंठा चौफुली ते भुसावळच्या नाहाटा महाविद्यालय चौफुली दरम्यान येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा आस्थापनांची तपासणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच महामार्ग परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित गस्त, पडताळणी आणि आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात विविध धडक कारवाया सुरु आहेत. त्या कारवायांची माहिती प्रसार माध्यमांच्या सहकार्याने जनतेला समजत आहेत. त्याचे स्वागत सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. महामार्गावरील ढाबे व हॉटेल्समुळे प्रवाशांना, सर्व सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये आणि गुन्हेगारांना अशा ठिकाणांचा आश्रय मिळू नये, हीच जनतेची रास्त अपेक्षा आहे.





