जळगाव : जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांज्याचा सुमारे 1 कोटी 86 लाख 16 हजार 400 रुपये किंमतीचा 930.82 किलो गांजा सर्व कायदेशीर प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार नष्ट करण्यात आला. या कारवाईसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीने मान्यता दिली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी जप्त अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्षातून ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या परिसरामागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, अशा पद्धतीने संपूर्ण गांजा नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
या कारवाईवेळी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी तसेच कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कठोर कारवाई सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





