ठेकेदारास लुटणारे तिघे गजाआड

On: July 6, 2026 7:42 PM

जळगाव : रावेर तालुक्यातील अजंदा गावानजीक असलेल्या रेल्वे पुलानजीक मजूर पुरवण्याच्या बहाण्याने बोलावून एका बांधकाम ठेकेदाराची लूट करणाऱ्या तिघा लुटारुंना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. अटकेतील तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख जावेद शेख अमान हे बांधकाम ठेकेदार असून मजूर मिळवून देण्याचे आमिष दाखवत लुटारुंनी त्यांना अजंदा येथे बोलावले. रेल्वे पुलाजवळ ते गेल्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यांच्या खिशातील रोख रक्कम तिघांनी हिसकावली. त्यानंतर मोबाईल फोनद्वारे ऑनलाइन व्यवहार करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये सुमारे ८ हजार रुपये वर्ग करून तिघे लुटारु पसार झाले.

रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहका-यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयीत आरोपींचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून तिघा संशयीतांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या तिघांमधे शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२), शेख मोईन शेख नझीम (वय १९) आणि फैजल बेग हिदायत बेग (वय १९, सर्व रा. रावेर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एमएच-१९-ईडी-५५८० क्रमांकाची मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांची पोलीस कोठडी मिळवून पुढील तपास सुरू ठेवला असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी करावे केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment