जळगाव : आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले जळगाव शहर वाहतूक शाखेतील सहायक फौजदार अशरफ शेख यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेसह हिंदू-मुस्लिम सांप्रदायिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडविले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना त्यांनी काही काळ हातात टाळ घेऊन विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी होत भक्तीत तल्लीन होण्याचा आनंद लुटला. मात्र, त्याचवेळी बंदोबस्तावरील जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी आपल्या कर्तव्यालाही तेवढेच प्राधान्य दिले.
त्यांच्या या कृतीमुळे सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि सर्वधर्मसमभावाचा सकारात्मक संदेश वारकऱ्यांमध्ये पोहोचला. कर्तव्य आणि श्रद्धा यांचा समतोल राखत दिलेला हा आदर्श अनेकांकडून कौतुकास पात्र ठरत आहे.
सहायक फौजदार अशरफ शेख यांनी यापूर्वी जळगाव शहर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
एमआयडीसी परिसरात कार्यरत असताना त्यांनी नागरिकांशी उत्तम जनसंपर्क निर्माण केला. या विश्वासाच्या बळावर अनेक संभाव्य अप्रिय घटना रोखण्यात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विविध गंभीर गुन्ह्यांच्या उकलसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि वेळोवेळी केलेली प्रभावी कारवाई यामुळे पोलीस दलात त्यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंढरपुरातील बंदोबस्तादरम्यान त्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा आणि सांप्रदायिक ऐक्याची भावना ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.






