दरोडयाचा उधळला कट – शस्त्र, बनावट नोटांसह दोघे अटकेत

On: July 10, 2026 9:55 PM

जळगाव : रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तलवार, पंच, टॉमी, लाल मिरची पावडर, दोरखंड, बनावट नोटा तसेच गुन्ह्यात वापरण्यात येणारी ईको कार असा सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पाल गावातून संशयित ईको वाहनाने रावेरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. संशयितांनी पोलिसांना पाहताच भरधाव वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. आभोडा गावाजवळ वाहन घसरून अडकल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्यांच्या इतर साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींना जमावाने मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांची सुटका करून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी तलवार, पंच, टॉमी, लाल मिरची पावडर, दोरखंड, ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि एमएच-१९-ईए-२४०३ क्रमांकाची ईको कार जप्त केली. प्राथमिक तपासात हे आरोपी रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची माहिती दिली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या टोळीने यापूर्वी आणखी गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे शोध पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment